पुढील ३ ते ४ दिवसांत लुथरा बंधू गोव्यात

न्यायालयाकडून ट्रान्झिट अटकपूर्व जामिनास नकार : थायलंड पोलिसांकडून संशयित ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th December, 11:32 pm
पुढील ३ ते ४ दिवसांत लुथरा बंधू गोव्यात

पणजी : ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा या दोघांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले असून थायलंड रॉयल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दुर्घटनेनंतर फरार झालेल्या या दोघांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील तीन-चार दिवसांत गोव्यात आणण्यात येणार आहे. दिल्ली न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून गोवा पोलिसांचे पथक लवकरच थायलंडला रवाना होणार आहे.

आंतरराष्ट्रीय यंत्रणांची मदत आणि कारवाई
शनिवारी मध्यरात्री क्लबला आग लागल्यानंतर १.१७ वाजता लुथरा बंधूंनी थायलंडचे तिकीट बुक केले आणि पहाटे ५.२० ला देश सोडला. यानंतर गोवा पोलिसांनी सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय आणि इंटरपोलच्या मदतीने त्यांचे पासपोर्ट रद्द केले. सध्या त्यांना थायलंडमध्ये स्थानबद्ध केले असून ‘डिपोट’ करण्याच्या प्रक्रियेला ३ ते ४ दिवस लागणार आहेत.

सहमालक अजय गुप्ताला ७ दिवसांची कोठडी
याच प्रकरणातील सहमालक अजय गुप्ता यांना दिल्लीतून अटक केल्यानंतर म्हापसा न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुप्ता यांनी पाठीच्या कण्याचे कारण देत कोठडी टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याने न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली. न्यायालयातून बाहेर पडताना, "मी केवळ सायलंट पार्टनर असून या दुर्घटनेशी माझा संबंध नाही," असे गुप्ता यांनी सांगितले.

‘गोया’ नाईट क्लब सील
हडफडे दुर्घटनेनंतर प्रशासन जागे झाले असून वागातोर येथील प्रसिद्ध ‘गोया’ नाईट क्लब संयुक्त अंमलबजावणी समितीने पूर्णपणे सील केला. कुळाच्या जमिनीत क्लबची उभारणी करणे आणि परवान्यांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

न्यायालयीन घडामोडी
हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर लुथरा बंधूंनी दिल्लीत ‘ट्रान्झिट अटकपूर्व जामीन’ मिळवण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. दुसरीकडे, निलंबित पंचायत सचिव रघुवीर बागकर आणि इतर अधिकाऱ्यांनी म्हापसा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर सुनावणी सुरू आहे. तसेच व्यवस्थापकांच्या जामीन अर्जावर १५ तारखेला सुनावणी होणार आहे.

#Goa #RomeoLaneTragedy #ThailandArrest #GoaPolice #MapusaCourt #NightClubSafety #GoyaClubSealed
हेही वाचा