कोकणी राखणदार मंचची पत्राद्वारे कारवाईची मागणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा शिक्षक पात्रता चाचणीत (जीटीईटी) कोकणीतील असभ्य भाषेतील उताऱ्यासाठी शालान्त मंडळाने संबंधित पेपर सेटरला नोटीस जारी केली आहे. शालान्त मंडळ त्या उताऱ्याविषयी संबंधित पेपर सेटरकडून स्पष्टीकरण घेणार आहे, त्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गोवा शिक्षक पात्रता चाचणी (जीटीईटी) ९ आणि १० डिसेंबर रोजी झाली. गोवा शालान्त मंडळातर्फे परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. आरटीई कायदा लागू झाल्यानंतर भरती झालेल्या शिक्षकांसह शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्यांना ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी जीटीईटी सक्तीची आहे. बुधवार, १० डिसेंबर रोजी कोकणीचा पेपर झाला. एक उतारा (परिच्छेद) देऊन त्याच्या आधारे प्रश्न पेपरमध्ये विचारले होते. उताऱ्यातील कोकणी भाषा सदोष आहे. तसेच उताऱ्यातील मजकूरही अश्लील आहे, असा दावा करून कोकणी राखणदार मंचचे संयोजक प्रकाश नाईक यांनी हरकत घेतली. शालान्त मंडळाला पत्र लिहून त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
जीटीईटी परीक्षेत प्रश्नपत्रिका काढणाऱ्या पेपरसेटरांची पात्रता काय आहे ? ही पात्रता कोण ठरवते ? परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम पेपरसेटरला किती दिवस आधी दिला होता, असे प्रश्न त्यांनी शालान्त मंडळाला विचारले. जीटीईटी परीक्षा टॅबवर दिली होती. प्रश्नपत्रिका थेट टॅबवर उपलब्ध झाली. छापील प्रश्नपत्रिका नव्हती. पेपर सेटरमार्फत थेट ही प्रश्नपत्रिका टॅबवर पाठवण्यात आली की मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली होती ? अशी विचारणा कोकणी राखणदार मंचने केली आहे. उताऱ्यातील मजकूर अश्लील आणि भाषाही सदोष आहे. कोकणी ही गोव्याची राजभाषा आहे. प्रश्नपत्रिकेत अश्लील मजकुरावर आधारित प्रश्न विचारणे कितपत योग्य, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शालान्त मंडळ ही स्वायत्त संस्था असल्याने संबंधित पेपर सेटरवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कोकणी राखणदार मंचचे संयोजक प्रकाश नाईक यांनी केली.