९४ जणांची माघार : मंत्रीपुत्र, पत्नी, कन्या मैदानात

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या ५० जागांसाठी आता २२६ उमेदवार अंतिम रिंगणात उरले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत उत्तर आणि दक्षिण गोव्यातून प्रत्येकी ४७ अशा एकूण ९४ उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता खऱ्या अर्थाने राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून प्रचाराला वेग येणार आहे.
उत्तर आणि दक्षिण गोव्यात थेट लढती
अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर उत्तर गोव्यातून १११ तर दक्षिण गोव्यातून ११५ उमेदवार रिंगणात आहेत. उत्तरेतील पाळे मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस, तर दक्षिणेतील कवळे मतदारसंघात मगो आणि आरजीपी यांच्यात थेट लढत होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात युती असूनही खोर्ली आणि मोरजी मतदारसंघात हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.
अपक्ष उमेदवारांची स्थिती
उत्तर गोव्याच्या १४ मतदारसंघांतून ४० तर दक्षिणेतील २१ मतदारसंघांतून २३ अपक्ष उमेदवार नशीब आजमावणार आहेत. सांखवाळ मतदारसंघात सर्वाधिक ५ तर धारगळमध्ये ३ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
या मतदारसंघांत अपक्ष नाहीत
उत्तर गोव्यातील ११ (पेंन्द द फ्रान्स, सांताक्रुझ, ताळगाव, चिंबल, शिरसई, कळंगुट, रईस-मागूस, सेंट-लॉरेन्स, केरी, पाळे आणि होंडा) आणि दक्षिण गोव्यातील ४ (कवळे, नावेली, रिवण आणि खोला) मतदारसंघांत एकही अपक्ष उमेदवार नसल्याने तेथे केवळ राजकीय पक्षांमध्येच सामना रंगणार आहे.
दिग्गजांचे नातेवाईक रिंगणात
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक (खोर्ली), मंत्री सुभाष शिरोडकर यांची कन्या गौरी शिरोडकर (शिरोडा), कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांच्या पत्नी मारसियन मेंडिस (कुठ्ठाळी) आणि माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या पत्नी कविता कांदोळकर (कोलवाळ) हे दिग्गज नेत्यांचे नातेवाईक या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.