पहाटे धुके, सकाळी थंडीसह गार वाऱ्याची झुळूक, तर दुपारनंतर उन्हाची तीव्रता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील काही दिवस राज्यातील थंडीची तीव्रता वाढत आहे. शुक्रवारी पणजीत २०२५ मधील निचांकी म्हणजेच किमान १७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान १९ ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यादरम्यान पहाटे मध्यम स्वरूपाचे धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सध्या राज्यात रात्री आणि पहाटे तीव्र थंडी जाणवत आहे. पहाटे अनेक ठिकाणे धुके पडत आहे. सकाळी थंडीसह गार वाऱ्याची झुळूक अनुभवायला येत आहे. असे असले तरी दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे. शुक्रवारी पणजीत ३३.२ अंश, तर मुरगावमध्ये ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
याआधीची डिसेंबर महिन्यातील आकडेवारी पाहता १२ डिसेंबर १९६५ रोजी पणजीत १५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. १२ डिसेंबर १९८१ मध्ये १५.७ अंश, २४ डिसेंबर २०१६ रोजी १७.६ अंश, तर १९ डिसेंबर २०२१ रोजी १८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
राज्यात डिसेंबर महिन्यातील किमान तापमान साधारपणे २१ ते २२ अंशांदरम्यान असते. मागील चार दिवसात किमान तापमान सरासरीपेक्षा १.५ ते ३.५ अंशाने कमी होत आहे. याआधी हवामान खात्याने डिसेंबर महिन्यात राज्यातील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. खात्याने १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा येथील काही भागात थंडीच्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागात थंडी अधिक
राज्यातील ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. खासगी हवामान केंद्राच्या माहितीनुसार, शुक्रवारी सुर्ला येथे किमान १२ अंश सेल्सिअस, तर काणकोण येथे १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 