गोव्यात क्लब जळत होता... दिल्लीत लुथरा बंधूंनी बुक केली थायलंडची तिकिटे!

पहाटे ५.३० वाजता इंडिगोच्या विमानातून फुकेतमध्ये पलायन

Story: विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th December, 09:14 pm
गोव्यात क्लब जळत होता... दिल्लीत लुथरा बंधूंनी बुक केली थायलंडची तिकिटे!

पणजी : आपल्या क्लबला आग (Fire in Goa night club) लागली म्हणून कोणीही मालक तातडीने धावून आला असता. पण आगीत किती लोकांचा मृत्यू झाला हे कळण्याआधीच म्हणजे क्लब जळत असतानाच गोव्यात (Goa) यायचे सोडून रात्री १.१७ वाजता ‘मेक माय ट्रीप’वरून (make my trip) लुथरा बंधूंनी (Luthra brothers) थायलंडला (Thailand) पळून जाण्यासाठी विमानाची (airplane) तिकिटे बुक केली होती.


‘बर्च बाय रोमिओ लेन’ (Birch by Romeo Lane club) या क्लबला रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग वाढत गेली. क्लबमधील उपस्थितांकडून जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू होती. आगीने रौद्र रूप धारण केले. बचावकार्यासाठी अग्निशमन दल पोहचेपर्यंत आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या होत्या. हडफडेच्या (Arpora Goa) मिठागरात असलेल्या या क्लबची आग एवढी भीषण होती की, किनारी भागातील लोकांना कित्येक किलोमीटरच्या अंतरावरून ती दिसत होती.


ही आग नियंत्रणात आली ती पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास. त्यापूर्वी अडीच वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात झाली. पण आपला क्लब आगीत जळत असताना सौरभ आणि गौरव लुथरा (Saurabh and Gaurav Luthra) या दोन्ही बंधूंनी ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १.१७ वाजता थायलंडची तिकिटे बुक केली आणि पहाटे ५.३० वाजता इंडिगोच्या 6E 1073 या विमानाने ते दिल्लीहून फुकेत-थायलंडला पसार झाले. यातून या दोघांची मानसिकता दिसून येते.


एरवी गोवा पोलीस लुकआऊट नोटीस (lookout notice) काढण्यात माहीर आहेत. पण त्याच दिवशी सकाळपर्यंत लुकआऊट नोटीस काढली नव्हती. त्यामुळे पहाटे ५.३० वाजता दोघेही पसार झाले. त्यांच्याकडे अन्य कुठल्या देशांचे पासपोर्ट (passport) असते, तर तिथून ते त्या देशांतही पळाले असते आणि ते भारताच्या हातीही लागले नसते.


लुथरा बंधू पळाल्यानंतर गोवा पोलिसांचीही (Goa police) नाचक्की झाली. आधीच ही दुर्घटना आणि त्यात लुथरा बंधूंचे पलायन यामुळे पोलीस गांगरले, प्रशासनही गोंधळले. पण शेवटी विदेश व्यवहार मंत्रालय आणि इंटरपोलच्या (Interpol) मदतीने लुथरा बंधूंना गुरुवारी थायलंडमध्ये तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने स्थानबद्ध करण्यात आले.



शनिवारी (६ डिसेंबर) रात्री ११.४५ वाजता ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या हडफडे येथील क्लबला भीषण आग लागली. त्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सध्या न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. या दुर्घटनेनंतर सरकारने किनारी भागातील सर्व आस्थापनांचे दस्तावेज तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. सर्वांना सुरक्षा ऑडिट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत क्लबशी संबंधित सहमालक, व्यवस्थापक, कर्मचारी अशा सहा लोकांना अटक (six person arrested) केली आहे. तीन सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित (three government officers suspended) करून त्यांची पोलीस चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा