राज्यात महिन्याला सरासरी ८ जणींना गर्भाशयाचा कर्करोग

२०१९ ते २०२३ पर्यंतची आकडेवारी : देशात ३.८५ लाख महिलांना कर्करोगाचे निदान


12th December, 11:48 pm
राज्यात महिन्याला सरासरी ८ जणींना गर्भाशयाचा कर्करोग

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात २०१९ ते २०२३ दरम्यान ५२७ महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. याचाच अर्थ राज्यात वर्षाला १०५, तर महिन्याला सरासरी ८ महिलांना गर्भाशयाचा कर्करोग झाला. वरील कालावधीत संपूर्ण देशात ३.८५ लाख महिलांना कर्करोगाचे निदान झाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार बाग मिताली यांनी प्रश्न विचारला होता.
उत्तरातील माहितीनुसार, वरील कालावधीत राज्यात गर्भाशयाचा कर्करोग असणाऱ्या महिलांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १०१ महिलांना हा कर्करोग झाला होता. २०२० मध्ये १०४, २०२१ मध्ये १०६, २०२२ मध्ये १०७ तर २०२३ मध्ये १०९ महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यांत रुग्णांची संख्या तुलनेने अधिक होती. तर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश येथे रुग्ण संख्या कमी होती.
केंद्र सरकारतर्फे यूआयपी मोहिमेअंतर्गत १२ प्रकारच्या रोगांसाठी ११ प्रकारच्या लसी दिल्या जातात. यामध्ये गर्भाशयाच्या कर्करोगासाठीची एचपीसी लस दिली जात नाही. असे असले तरी खात्यातर्फे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या लसीकरणाबाबत क्षमता विकास कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. असंसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रातर्फे राज्य सरकारांना आर्थिक मदत दिली जाते. यानुसार देशभरात ३६ राज्यस्तरीय केंद्र, ७५३ जिल्हास्तरीय केंद्र, ७७० जिल्हा रुग्णालये उभारण्यात आली आहेत.
दहा वर्षांत ४४१ मृत्यू
लोकसभेतील अन्य एका प्रश्नाच्या उत्तरानुसार, राज्यात २०१४ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीत ४४१ महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. वरील कालावधीत सर्वाधिक ४८ मृत्यू २०२३ मध्ये झाले होते. यादरम्यान संपूर्ण देशात ३.१९ लाख महिलांचा या कर्करोगाने मृत्यू झाला होता.
दिवसाला ४ रुग्ण
भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या कर्करोग नोंदणी प्रकल्पातील आकडेवारीनुसार, २०१५ ते २०२४ दरम्यान राज्यातील १७ हजार १४२ जणांना कर्करोग झाला होता. याचाच अर्थ राज्यात महिन्याला १४२ जणांना, तर दिवसाला ४ जणांना कर्करोगाचे निदान झाले. यामध्ये गर्भाशयासह अन्य सर्व प्रकारच्या कर्करोगांचा समावेश आहे.

हेही वाचा