‘चाणक्य’वेळी समस्या जाणवली नाही; प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांचे वक्तव्य
पणजी : कला अकादमीतील साऊंड, प्रकाश योजनेसंदर्भात गेल्या काही दिवसांत आपण ऐकून होतो. परंतु, साऊंड, प्रकाश योजना सर्वकाही व्यवस्थित आहे. आपल्या 'चाणक्य' नाटका दरम्यान कोणतीही समस्या जाणवली नाही, असे वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी केल्याने कला अकादमीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
⚠️ घटना: काहीच दिवसांपूर्वी कला अकादमीत अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'पुरुष' नाटकाचा प्रयोग झाला. प्रयोग सुरू असताना आणि पोंक्षे अभिनय करीत असतानाच प्रकाश योजनेत बिघाड झाला. त्यामुळे 'दहा मिनिटांसाठी पडदा टाकतो आणि पुन्हा येतो' असे म्हणत पोंक्षे यांनी मध्येच नाटक थांबवले होते.
💬 प्रतिक्रिया: त्यावरून विरोधी आमदारांनी कला अकादमीवरून सरकार आणि मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्यावर टीकास्र सोडले होते. खुद्द पोंक्षे यांनीही या तांत्रिक बिघाडाबाबत मत व्यक्त करताना, गोव्यातील प्रसिद्ध कला अकादमीच्या नाट्यगृहाला व्यवस्थापकच नसणे ही दुर्दैवी बाब आहे.
🌟 मुख्यमंत्री लक्ष घाला: आमच्या नाटकावेळी प्रकाश योजनेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रकाश योजनेचा खेळ रसिकांना पाहता आला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात स्वत: लक्ष घालून कला अकादमीच्या नाट्यगृहाची स्थिती सुधारावी, असे त्यांनी म्हटले होते.
🎤 अभिनेते मनोज जोशी यांचे मत: अभिनेते मनोज जोशी यांनी मात्र आपल्या 'चाणक्य' नाटकाच्या प्रयोगावेळी कोणतीही समस्या जाणवली नसल्याचे वक्तव्य केले. दोन प्रसिद्ध अभिनेत्यांनी व्यक्त केलेल्या भिन्न मतांमुळे गोमंतकीय नाट्य रसिकांमध्येही कला अकादमीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.