वन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली माहिती
पणजी : हवामान शीतल राखण्यासाठी नगरपालिका क्षेत्रातील मोकळ्या जागांचा ग्रीन लंग्स म्हणजेच झाडे लावून वनराईचा विकास करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी राज्यातील नगरपालिकांकडून सूचना मागविण्यात येतील. कार्यवाहीसाठी वन खाते व नगरपालिका प्रशासन खात्यांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती वन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यानी दिली आहे.
वन मंत्री विश्वजीत राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या कार्यवाहीवर चर्चा करण्यात आला. स्टूडिओ पीओडी या एजन्सीच्या मदतीने प्रकल्पाची कार्यवाही होईल. नगरपालिका क्षेत्रातील मोकळ्या जागांचा शोध घेतला जाईल. हे काम नगरपालिकांना करावे लागेल. यासाठी नगरपालिकांकडून सूचना मागविल्या जातील. मोकळ्या जागांचा शोध घेतल्यानंतर टप्प्याटप्पाने झाडे लावून ग्रीन लंग्ज उभारण्यात येतील. कार्यवाही तसेच आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यावर चर्चा झाली.
मोकळ्या जागांचा शोध आणि सूचना आल्यानंतर पुढील कामे सुरू होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. नगरपालिकांना जो निधी दिला जातो त्याच्या वापर ग्रीन लंग्जसाठी केला जाणार आहे. गरज पडल्यास खास निधीची तरतूद करण्यात येणार आहे. ग्रीन लंग्ज उपक्रमाबाबत झालेली ही दुसरी बैठक आहे.