पूर्व किनारपट्टीवरुन पश्चिम किनाऱ्यावर आलेल्या या कासवाची टॅगवरुन पटली ओळख.
रत्नागिरी : अविश्वसनीय असे सुमारे ३५०० किमीचे अंतर पार करून एक ऑलिव रिडले प्रजातीची मादी कासव ओडिशाहून महाराष्ट्रातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्याची नोंद झाली आहे. या इवल्याशा कासवाने गुहागरच्या पांढर्या वाळूच्या किनाऱ्यावर एकूण १२५अंडी घातली असून, त्यापैकी आतापर्यंत किमान १०७ अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडली आहेत.
या कासवाची ओळख तिच्या फ्लिपरवर असलेल्य टॅगवरून झाली. झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (झेडएसआय) ने मार्च २०२१ मध्ये ओडिशाच्या गहिरमाथा समुद्री अभयारण्यात '०३२३३' क्रमांकाचा टॅग लावला होता. ही मादी त्या वर्षी टॅग केलेल्या तब्बल १२,३४० ऑलिव रिडले कासवांपैकी एक आहे. या पूर्वी कधीही पूर्व किनाऱ्यावर टॅग केलेला कासव पश्चिम किनाऱ्यावर पोहोचल्याची नोंद झाली नव्हती. ही घटना दुर्मीळ असली तरी अत्यंत महत्त्वाची आहे, असे भारतीय वन्यजीव संस्थान चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले.
या मादी कासवाने श्रीलंकेच्या आसपासच्या क्षेत्रातून प्रवास करत तब्बल ३५०० किमीचा मार्ग पार केला आहे. रामेश्वरमजवळील पंबन कॉरिडॉरचा वापर करून त्याने काही अंतर वाचवले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया चे डॉ. बसुदेव त्रिपाठी, यांनी या मादी कासवाला टॅग केले होते. ही घटना ऑलिव रिडले कासवाच्या मास नेस्टिंग वर्तनाविषयी माहीत असलेल्या ज्ञानात अजून वृद्धी करेल असे ते म्हणाले. ऑलिव रिडले कासव सामूहिक पद्धतीने हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन अंडी घालतात. पूर्वी असे मानले जात होते की हे कासव फक्त ओडिशा आणि पूर्व किनाऱ्यावरच मास नेस्टिंग करतात. मात्र, या प्रजातीचे कासव भारतीय महासागरातून अरबी समुद्रामार्गे गोव्यातील किनाऱ्यांवरही येतात. मात्र रत्नागिरीत आगमनाने स्पष्ट झाले आहे की काही कासव बंगालच्या खाडीतून पश्चिम किनाऱ्यांकडेही वळतात.