नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कडक धोरण अवलंबिले आहे . भारतीय सैन्य आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागातील स्थानिक पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. याच अनुषंगाने पंजाबमधील अमृतसरमधून एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे.
अमृतसरच्या अजनाला परिसरातील भारत-पाकिस्तान सीमेवरील साहोवाल गावाजवळ स्फोटकांनी भरलेल्या दोन पोत्या सापडल्या आहेत. यातील आरडीएक्स आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स सापडल्याने खळबळ उडाली आहे. देशाच्या सीमेवर इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणि शस्त्रे पाठवण्यामागे पाकिस्तानी घुसखोरचा हात असल्याचा अंदाज स्थानिक पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळील चक बाला दरिया गावात एका शेतकऱ्याच्या शेतातून पंजाब पोलीस आणि बीएसएफच्या ११७ बटालियनने संयुक्त कारवाईत ही जप्ती करण्यात आली. गव्हाच्या शेतातून दोन मोठ्या पॅकेटमधून ५ हँडग्रेनेड, ३ पिस्तूल, ८ मॅगझिन, २२० जिवंत काडतुसे, ४.५ किलो स्फोटके (आरडीएक्स), २ बॅटरी चार्जर आणि २ रिमोट जप्त करण्यात आले. पंजाब पोलीस आणि लष्कराच्या अनेक पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि तपास सुरू आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सध्या तपास सुरू आहे आणि सर्व सुरक्षा एजन्सींना सतर्क करण्यात आले आहे.