एनआयएने केली अटक

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) (National Investigation Agency) (NIA) दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील कार बॉंबस्फोटप्रकरणात (Delhi Red Fort Car Bomb Blast) आय २० (I-20) कारचा मालक आमिर रशीद अली (Car owner Aamir Rashid Ali) याला सहसूत्रधार म्हणून अटक केली आहे.
काश्मीर येथील या इसमाने डॉ. उमर नबी सोबत हल्ल्याचा कट रचल्याचे तपासात पुढे आले आहे.
अटक करण्यात आलेला आमरि रशीद अली जम्मू काश्मीरमधील पंपोर जिल्ह्यातील संबूरा येथील मूळ रहिवासी आहे. एनआयएच्या तपासात आमिरने डॉ. उमर उन नबी सोबत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे.
कारच्या व्यवहारासाठी आमिर दिल्लीला आला होता. नंतर त्याच कारचा वापर आयईडी स्फोट घडवून आणल्याचे तपासात पुढे आले आहे.
कारमध्ये स्फोट झाल्यानंतर चालक डॉ. उमर उन नबी त्यात ठार झाला. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील निवासी होता व फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठातील जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक होता.
डॉ. उमर याचे आणखी एक वाहनही तपास यंत्रणेने जप्त केले आहे. याप्रकरणात पुरावे गोळा करण्यासाठी वाहनांची तपासणी केली जात आहे. ‘एनआयए’ने याप्रकरणी आतापर्यंत ७३ साक्षीदारांची तपासणी केली आहे.
त्या साक्षीदारांमध्ये स्फोटात जखमी झालेल्यांचाही समावेश आहे. एनआयए जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश पोलिसांसह इतर तपास यंत्रणांशी समन्वय ठेवून राज्यांमध्ये तपास करीत आहे.
पैसे दिले ‘जैश’च्या हॅंडलरने
गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली कार बॉंबस्फोट प्रकरणात याप्रकरणात अटक केलेल्या मुजम्मिल, उमर व शाहीन या तीन डॉक्टरांशी संबंधित २० लाख रुपयांच्या रकमेचा व्यवहार उघडकीस आणला आहे.
ही रक्कम जैश ए महंमदच्या हॅंडलरने हवालाच्या माध्यमातून पाठवल्याचा संशय असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणातील आरोपींनी या रकमेतील ३ लाख रुपये २६ क्विंटल एनपके खत खरेदी करण्यासाठी खर्च केले. खरेदी केलेल्या खतात नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस याचे मिश्रण असून, स्फोटके तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.
डॉ. शाहीन व डॉ. उमर नबी यांच्यात ही रक्कम वापरण्यावरून तणाव निर्माण झाल्याचे अधिकारी सांगतात. मुझम्मिलकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले होते. त्यामुळे या कटातील आर्थिक दुवे एकत्र करण्यासाठी मदत झाल्याचे तपास यंत्रणेने सांगितले.