सौदी अरेबियात अपघातात ४२ भारतीय यात्रेकरू ठार : हैदराबादमधील असल्याची शक्यता

बस व टॅंकरमध्ये धडक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
56 mins ago
सौदी अरेबियात अपघातात ४२ भारतीय यात्रेकरू ठार : हैदराबादमधील असल्याची शक्यता

सौदी अरेबिया (Saudi Arabia) : येथील मदीना (Madinah) शहराजवळ बस-टँकरच्या भीषण अपघातात ४२ भारतीय यात्रेकरू ठार (42 Indian Umrah pilgrims feared dead) झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात बहुतांश प्रवासी हैदराबादमधील (Hyderabad) असल्याची शक्यता आहे.

मदीना शहराजवळ उमराह यात्रेकरंना घेऊन जाणारी बस व डिझेल टॅंकरमध्ये धडक होऊन भीषण अपघात घडला. 

सौदी अरेबियातील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

प्राप्त माहितीनुसार, बस मक्का येथून मदिना येथे जात असताना भारतीय वेळेनुसार, मध्यरात्रीनंतर १.३० वाजता वरील अपघात घडला. स्थानिक वृत्तानुसार बसमधील जास्त प्रवासी तेलंगण, हैदराबाद येथील आहेत. 

तेलंगणा सरकारने रियाधमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दिल्लीतील अधिकारी यांना सतर्क करून दूतावासातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली. 

अपघातानंतर बसमध्ये आग लागली तेव्हा ४२ उमराह यात्रेकरू बसमध्ये होते, अशी  माहिती हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी दिली. रियाधमधील भारतीय दूतावासाचे ‘डेप्युटी चीफ ऑफ मिशन’ अबू मॅथेन जॉर्ज यांच्याशी संपर्कात आहे व अपघातासंदर्भात माहिती गोळा केली जात असल्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

मृतदेह भारतात परत आणावेत व जखमींना योग्य वैदयकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ओवैसी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

 

हेही वाचा