दिल्ली : भारत सरकारने लादली १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी

भारताविरोधात चिथावणीखोर व दिशाभूल करणारी माहिती पसरविल्याबद्दल कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
दिल्ली : भारत सरकारने लादली १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानला अद्दल घडबण्यासाठी राजकीय, सामरीक, आर्थिक  मार्गांनी जेरीस आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार माहिती व प्रसारण मंत्रालयाने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. या चॅनेल्सवर देशविरोधी, धार्मिक तेढ निर्माण करणारी, चिथावणीखोर माहिती व खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या.  


या बंदी घालण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेल्समध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, जिओ न्यूज यांसारख्या पाकिस्तानमधील प्रमुख वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. हे चॅनेल्स भारताविरोधात अपप्रचार करत होते, तसेच भारतीय लष्कर व सुरक्षा यंत्रणांविषयी खोटी व दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते. त्यामुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा धोका निर्माण झाला होता. विशेष म्हणजे,  पत्रकार इर्शाद भट्टी, आस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांच्या यूट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या इतर हँडलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि राझी नामा तसेच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या चॅनलचाही समावेश आहे.


YouTube unveils Pakistan's top creators and videos for 2024


गृह मंत्रालयाने नमूद केल्यानुसार, या चॅनेल्सनी पहलगाम हल्ल्यानंतर भारतविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर तातडीने हालचाली करत भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा व अन्य संबंधित कायद्यांनुसार या चॅनेल्सवर बंदी घातली. माहितीनुसार, बंदी घालण्यात आलेल्या या १६ यूट्यूब चॅनेल्सचा भारतात ६ कोटी ३८ लाख इतका मोठा सबस्क्राइबर बेस आहे. यातून या चॅनल्सना मोठा आर्थिक फायदा होतो. पण आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारल्याने या चॅनल्सना मोठा आर्थिक फटका संभवतो. 



दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर केंद्र सरकारने देशभरात सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे व देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा देशविरोधी अपप्रचार सहन केला जाणार नाही व देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. 

भारताने बीबीसीला पत्र लिहून आपला आक्षेप व्यक्त केला. 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील बीबीसीच्या वृत्तांकनावर भारतानेही तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. रिपोर्टिंगच्या पद्धतीवर नाराज असलेल्या केंद्र सरकारने बीबीसी इंडियाचे प्रमुख जॅकी मार्टिन यांना पत्र लिहिले आहे.

बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा