पाकिस्तान लष्करामध्ये पसरली अस्वस्थता, मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र सुरू.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने भारत सरकारने पाकिस्तानला अद्दल घडबण्यासाठी राजकीय, सामरीक, आर्थिक मार्गांनी जेरीस आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानचा लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांच्या बेपत्ता होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. विविध सोशल मिडिया हँडल्सच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, जनरल मुनीर सध्या रावळपिंडीतील एका गुप्त बंकरमध्ये लपल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दाव्यांची पुष्टी झालेली नाही.
पाकिस्तानी सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या तसेच पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या वाचाळपणामुळे येथील लष्कराच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्वच स्तरांत मोठी अस्वस्थता दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ५,००० सैनिक आणि अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी भारतीय सैन्याच्या संभाव्य कारवाईची भीती व्यक्त करत नोकरी सोडण्याचा आग्रह धरल्याचे समजते. काही सैनिक घरी परतल्याचीही माहिती आहे. या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करत पाकिस्तानच्या ११व्या कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल उमर बुखारी यांनी जनरल असीम मुनीर यांना पत्र लिहून लष्करातील सैनिकांचे मनोधैर्य ढासळल्याचा इशारा दिला आहे.
'कधीही.. कुठेही...' भारतीय नौदलाने पाकिस्तानला दिला इशारा!
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात अँटी-शिप क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले. यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा समावेश होता आणि ए क्लास श्रेणीच्या विध्वंसकांसह निलगिरी आणि क्रिवाक-श्रेणीच्या फ्रिगेट्सने भाग घेतला. भारतीय नौदलाने आपल्या दीर्घ पल्ल्याच्या अचूक स्ट्राइक क्षमतेचे प्रदर्शन केले असून, भारतीय नौदल नेहमी, कुठेही, कोणत्याही परिस्थितीत देशाच्या समुद्री हितसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी सज्ज, सक्षम आणि भविष्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. यावेळी पाकिस्तानने नेव्हिगेशनल वॉर्निंग जारी केली होती.