श्रीनगर : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी दहशतवाद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसांत लष्कर-ए-तैयबाचा शीर्ष कमांडर शाहिद अहमद कुट्टे याच्यासह पाच दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी रात्रीपर्यंत दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियां आणि कुलगाम जिल्ह्यांमध्ये ही मोठी मोहीम राबवण्यात आली.
पुलवामाच्या मुरन भागात एहसान-उल-हक शेख याचे घर उद्ध्वस्त करण्यात आले. एहसान याला २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण मिळाले होते आणि तो अलीकडेच काश्मीरमध्ये घुसखोरी करून परतला होता. शोपियांच्या छोटीपोरा गावात लष्करचा सक्रिय कमांडर शाहिद अहमद कुट्टे याचे घरही पाडण्यात आले. तो गेली तीन ते चार वर्षे विविध राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होता.
कुलगाम जिल्ह्यातील मतलहामा भागात जाकिर अहमद गनी याचे, तर शोपियांच्या जैनपोरा गावात अदनान शफी या दहशतवाद्याचे घरही जमीनदोस्त करण्यात आले. अदनानने एका परप्रांतीय मजुराची हत्या केली व नंतर दहशतवादी बनला. त्याचप्रमाणे, उत्तर काश्मीरच्या कलारूस भागात लष्करचा पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दहशतवादी फारूक टीडवा याचे घरही स्फोटकांद्वारे उडवण्यात आले.
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर छापेमारी आणि चौकशी सुरू आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये एकट्या अनंतनाग जिल्ह्यातून १७५ जणांची चौकशी केली जात आहे. श्रीनगरच्या बटमालू आणि डाउनटाउन भागातही पोलिसांनी संशयितांवर कारवाई केली आहे.