एकाचे घर बॉम्बने उडवले, दुसऱ्याच्या घरावर चालवला बुलडोझर
श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली असून, संबंधित दहशतवाद्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील गोरी भागात दहशतवादी आदिल ठोसर याचे घर सर्च ऑपरेशनदरम्यान बॉम्बस्फोटाद्वारे उडवण्यात आले. सुरक्षा दलांना येथे संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तेथे स्फोटके पेरली आणि खबरदारी म्हणून माघार घेतली. काही वेळाने घरात स्फोट झाला. दरम्यान दक्षिण काश्मीरच्या त्राल भागात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी आसिफ शेख याचे घर प्रशासनाने बुलडोझर वापरून जमीनदोस्त केले.
पर्यटकांवर हल्ला, २६ ठार
मंगळवारी पहलगामच्या बायसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंध गोळीबार केला. या अमानुष हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ विदेशी व २ स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. १४ जण गंभीर जखमी आहेत.
‘टीआरएफ’ने घेतली जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी लष्करशी संबंधित द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या पाकिस्तानी गटाने घेतली आहे. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेपूर्वी झालेला हा हल्ला, २०१९ मधील पुलवामा घटनेनंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.