जम्मू काश्मीर : एलओसीवर पाकिस्तानची आगळिक, भारतीय सैन्याचे जोरदार प्रत्युत्तर

बांदीपूरात चकमक सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 11:57 am
जम्मू काश्मीर : एलओसीवर पाकिस्तानची आगळिक, भारतीय सैन्याचे जोरदार प्रत्युत्तर

श्रीनगर :  जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव चिघळला आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या.

बांदीपूरा जिल्ह्यात चकमक

बांदीपूरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपुरा भागात आज सकाळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या परिसरात दहशतवादी लपले असल्याची  गोपनीय माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, मात्र सध्या कुठलीही जिवीतहानी झाल्याची माहिती नाही. शोध मोहीम सुरुच आहे.

२५ एप्रिलच्या रात्री एलओसीवर जोरदार प्रत्युत्तर

भारतीय सेनेने २५ एप्रिलच्या रात्री एलओसीवर पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. हाती आलेल्या माहितीनुसार , पाकिस्तानकडून लहान शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला होता. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सेनाप्रमुख काश्मीर दौऱ्यावर

सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच श्रीनगर व उधमपूर दौऱ्यावर जाणार आहेत. ते घाटीतील सुरक्षा परिस्थितीचा आणि एलओसीवरील संघर्षविराम उल्लंघनाच्या प्रकारांचा आढावा घेतील. दौऱ्यात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह इतर सुरक्षा यंत्रणांशी ते चर्चा करणार आहेत.

सिमा भागात हाय अलर्ट

पहलगाम हल्ल्यानंतर श्रीगंगानगर (राजस्थान) आणि नैनीताल (उत्तराखंड) येथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस अधिकारी हाय अलर्टवर आहेत. सार्वजनिक ठिकाणी गस्त आणि नजर ठेवली जात आहे. दरम्यान उधमपूरच्या डुडू-बसंतगड भागात काल झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला. याआधी बारामुला जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यांच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा