पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांचे हत्याकांड

जगभरातून हल्ल्याचा निषेध

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 12:44 am
पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांचे हत्याकांड

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात २८ पर्यटकांना जीव गमवावा लागला. अनेक जण जखमी असून या प्रकारामुळे पृथ्वी​वरील स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या पहलगामला रक्ताचा टिळा लागला आहे. पर्यटकांसाठी सुरक्षित अशी ओळख असलेल्या पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाल्यामुळे याचे दूरगामी परिणाम येथील पर्यटनावर होणार आहेत. जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत असून दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने कंबर कसली आहे.


तुमको नहीं मार रहा... जाकर मोदी को बता देना

‘तुमको नहीं मार रहा... जाकर मोदी को बता देना!’, हातात बंदूक घेऊन उभा असलेला अतिरेकी असे म्हणाला आणि पुढच्या क्षणाला दुसऱ्याच एका पर्यटकावर गोळी झाडली. जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बायसरन येथे मंगळवारी झालेल्या अतिरेकी हल्ल्यातून वाचलेल्या महिला पीडितांचे अनुभव मन सुन्न करणारे आहेत.

हल्ल्यादरम्यान उपस्थित असलेल्या अनेक पर्यटकांनी प्राण वाचवण्यासाठी जंगलात धाव घेतली, तर काहीजण रक्ताच्या थारोळ्यात पडले. थोडक्यात बचावलेल्या एका महिलेने दिलेल्या जबाबानुसार, अतिरेकी धर्म विचारून गोळ्या झाडत होते. हे मुस्लिम नाहीत, मारून टाका, असे म्हणत तिच्या पतीवर गोळी झाडण्यात आली.

मी आणि माझे पती बसून भेल खात होतो. इतक्यात अतिरेकी आले. त्यांनी पाहिले आणि म्हटले, हे मुस्लिम नाहीत आणि त्यांनी माझ्या पतीवर गोळी झाडली, असे रडत रडत एका महिलेने सांगितले. दुसरी एक महिला हतबलपणे ओरडत होती, वाचवा, कुणीतरी मदत करा... यांना गोळी लागली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय, पण त्यातील दृश्ये इतकी हृदयद्रावक आहेत की ती दाखवणे शक्य नाही. मात्र महिलांच्या मदतीसाठी केलेल्या हाका आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे आहेत.


महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दिलीप डिसले, संजय लेले आणि अतुल मोने या महाराष्ट्रातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी घटनेचा निषेध केला आहे. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दहशतवाद्यांना सोडणार नाहीत. ज्या निरपराध लोकांचा यात जीव गेला आहे, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने, संजय लेले असे तिघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघे जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश आहे. मी प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो. तिने मला सांगितले की, माझ्यासमोर माझ्या वडिलांना आणि काकांना नाव विचारुन गोळ्या घातल्या. ते भेदरलेल्या अवस्थेत होते. मी त्यांना सांगितले की, स्वत: केंद्रीय गृहमंत्री तिथे पोहोचत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही संपर्क सुरू आहे. त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केली जाईल.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र


पहलगाममध्ये ‘आईस लेन’चा आनंद घेण्यासाठी जातात पर्यटक

महाराष्ट्रातील हरिस सोलिया हे पहलगाममध्ये गेले होते. त्यांनी माध्यमांना सांगितले की, पहलगाममध्ये आईस लेन आहे. या आईस लेनचा आनंद घेण्यासाठी त्या भागात पर्यटक जातात. तिकडेच आम्हीदेखील होतो. माझ्यासोबत चार ते पाच ज्येष्ठ नागरिक होते, त्यामुळे मी खालीच होतो. वर गेलो नाही. वरच्या भागात गोळीबार झाला. ही घटना घडल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, लष्कराच्या गाड्याही येथे आल्या. चंदनवाडी ते पहलगाम हा ३० किलोमीटरचा रस्ता आहे. याच रस्त्यावरून आम्ही आलो होतो. या रस्त्यावरची सर्व दुकाने बंद झाली आहेत. जेव्हा गोळीबार झाला, तेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका दिसत होत्या. पोलिसांचाही ताफा दिसत होता.


जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या काही मोठ्या हल्ल्यांवर न​जर

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दोन डझनाहून अधिक लोक जखमी आहेत. मृतांमध्ये पर्यटक आणि स्थानिक रहिवासी दोघांचाही समावेश आहे. गेल्या अडीच दशकांत काश्मीरमध्ये पर्यटकांवरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

हल्ल्यानंतर फरार झालेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सुरक्षा दलांनीही मोठे अभियान सुरू केले आहे. काश्मीरमध्ये हा हल्ला अशा वेळी झाला, जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स भारत दौऱ्यावर आले आहेत. २००० पासून २०२५ पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अनेकदा पर्यटक, भाविक आणि स्थानिकांना लक्ष्य केले आहे.

२००० ते २०२५ पर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर एक नजर

* २१ मार्च, २००० रोजी शीख समुदायावर हल्ला : दहशतवाद्यांनी २१ मार्चच्या रात्री अनंतनाग जिल्ह्यातील छत्तीसिंहपोरा गावात अल्पसंख्याक शीख समुदायाला लक्ष्य केले, ज्यात ३६ लोक मारले गेले.

* ऑगस्ट २००० मध्ये अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य केले : नुन्वान बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन डझन अमरनाथ यात्रेकरूंसह ३२ लोक मारले गेले.

* जुलै २००१ मध्ये १३ लोक मारले गेले : अनंतनागच्या शेषनाग बेस कॅम्पवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात अमरनाथ यात्रेकरूंना पुन्हा लक्ष्य करण्यात आले, ज्यात १३ लोक मारले गेले.

* १ ऑक्टोबर, २००१ रोजी ३६ लोकांनी प्राण गमावले : श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीर राज्य विधानमंडळ परिसरावर आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला, ज्यात ३६ लोक मारले गेले.

* २००२ मध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला : चंदनवारी बेस कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला आणि ११ अमरनाथ यात्रेकरू मारले गेले.

* २३ नोव्हेंबर, २००२ रोजी नऊ सुरक्षाकर्मी : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दक्षिण काश्मीरच्या लोअर मुंडा येथे इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) स्फोटात नऊ सुरक्षा दल कर्मचाऱ्यांसह, तीन महिला आणि दोन मुलांसह एकोणीस लोकांचा बळी गेला.

* २३ मार्च, २००३ रोजी काश्मिरी पंडितांवर हल्ला : दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील नंदीमार्ग गावात ११ महिला आणि दोन मुलांसह किमान २४ काश्मिरी पंडितांची हत्या केली.

* १३ जून, २००५ रोजी सरकारी शाळेसमोर स्फोट : पुलवामामध्ये एका सरकारी शाळेसमोर गर्दीच्या बाजारात स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याने दोन शाळकरी मुले आणि तीन सीआरपीएफ अधिकाऱ्यांसह तेरा नागरिक मारले गेले आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले.

* १२ जून, २००६ रोजी मजुरांना लक्ष्य केले : कुलगाममध्ये नऊ नेपाळी आणि बिहारी मजूर मारले गेले.

* १० जुलै २०१७ रोजी भाविकांच्या बसवर हल्ला : कुलगाममध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला, ज्यात ८ जणांचा मृत्यू झाला होता.

* ९ जून २०२४ भविकांवर हल्ला : जम्मू-काश्मीरच्या रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले.

हेही वाचा