पोलिसांच्या केले स्वाधीन : हिंदू संघटना आक्रमक
सावंतवाडी : काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने सावंतवाडीच्या गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी निषेध म्हणून गांधी चौकात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर ठोकण्यात आला होता. मात्र, शनिवारी सकाळी सावंतवाडी शहरातील एका मुस्लिम समाजाच्या भाजी विक्रेत्याने तो पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावरून उचलून आपल्या दुकानात नेऊन ठेवला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकाराची माहिती हिंदू संघटनांना मिळताच तेथील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र झाले आणि संबंधित भाजी विक्रेत्याला जाब विचारून चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.
या दरम्यान, भाजी मंडईत काही मुस्लिम समाजातील भाजी विक्रेते गावठी भाजी घेऊन येणाऱ्या ज्येष्ठ महिला विक्रेत्यांवर दादागिरी करत असल्याच्या तक्रारीही हिंदू बांधवांकडे आल्या. यावरून संतप्त हिंदू कार्यकर्त्यांनी अशा दादागिरी करणाऱ्या विक्रेत्यांना जाब विचारून अनधिकृतरित्या जागा अडवून बसण्यास मज्जाव केला. तसेच हिंदू महिला भगिनींवर दबाव आणू नये, असा इशाराही दिला.
या आंदोलनात सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, कृष्णा धुळापनावर, विश्वास घाग, शुभम हिर्लेकर, लादू रायका, संकल्प धारगळकर, हितेन नाईक, गजानन करमळकर, हेमंत बिरोडकर, सागर गावडे, शिवराज राऊत यांच्यासह हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.