नियमांचे उल्लंघन झाल्यास होणार कारवाई.
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व मीडिया चॅनेल्सना संरक्षण कारवाई आणि सुरक्षा दलांच्या हालचालींच्या थेट प्रक्षेपणास प्रतिबंध घालणाऱ्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
२६ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या सूचनेनुसार, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी कोणत्याही संरक्षण कारवाईचे किंवा सुरक्षा दलांच्या हालचालींचे रिअल टाईम कव्हरेज किंवा ‘सूत्रांवर आधारित’ माहितीचे प्रसारण टाळावे. मंत्रालयाने केबल टेलिव्हिजन नेटवर्क (सुधारणा) नियम, २०२१ च्या नियम ६(१)(प) चा हवाला देत सांगितले आहे की, अशा कारवायांचे वृत्तांकन फक्त सरकारच्या अधिकृत अधिकाऱ्यांच्या ब्रीफिंगपुरते मर्यादित असावे.
मंत्रालयाने सर्व मीडिया संस्थांना जबाबदारीने वृत्तांकन करण्याचे आवाहन करताना सांगितले आहे की, बेजबाबदार कव्हरेजमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, जसे कारगिल युद्ध, २६/११ हल्ला आणि कंधार अपहरणवेळी घडले होते. सूचनेनुसार, नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल.