पणजी : पंतप्रधान मोदी पहलगाम हल्ल्याचा बदला निश्चितच घेतील : मुख्यमंत्री सावंत

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th April, 04:37 pm
पणजी : पंतप्रधान मोदी पहलगाम हल्ल्याचा बदला निश्चितच घेतील : मुख्यमंत्री सावंत

पणजी : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यामध्ये कुठलीही तडजोड करणार नाहीत, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ताळगाव येथे आयोजित भाजप मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर व इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

देशातील शांती आणि विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाची दखल घेत पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोदी सरकार दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन वर्षांत १० ते १२ हजार नोकऱ्या

आगामी दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभाग, गोवा लोकसेवा आयोग आणि इतर खात्यांमध्ये मिळून १० ते १२ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. यातील सुमारे ४ हजार नोकऱ्या गोवा मानव संसाधन महामंडळामार्फत भरण्यात येणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार युवकांच्या भविष्याची काळजी घेत असून, विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम व उपक्रम सुरू करण्यात आले आहेत, मुख्यमंत्री सावंत यांनी रोजगाराच्या संधींबाबत माहिती देताना सांगितले. 

अल्पशिक्षित युवकांसाठी खास योजना

 केवळ उच्चशिक्षित युवकांसाठीच नाही, तर दहावी आणि बारावी नापास विद्यार्थ्यांसाठीही सरकारने विशेष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत आतापर्यंत १४ हजार युवकांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे ते म्हणाले. 

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या कार्याचा गौरव

या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या अध्यक्षपदाच्या १०० दिवसांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला. 'आमचो दामू नाईक @१००' या व्हिडिओद्वारे त्यांच्या कामगिरीचा आढावा सादर करण्यात आला.


हेही वाचा