वाळपई पोलिसांची कारवाई : तीन लाखांचे गोमांस जप्त
वाळपई : सत्तरी तालुक्यातील म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागवे येथे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कत्तलखान्यावर छापा घालून पोलिसांनी तीन लाखांचे गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारीही उपस्थित होते.
डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागवे-सत्तरी येथे बेकायदेशीर गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी सापळा रचून घटनास्थळी छापा घातला असता सुमारे ७५० किलो गोमांस जप्त करण्यात आले. बाजारपेठेत या गोमांसाची किंमत ३ लाखांच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. या कारवाईत पोलिसांनी कत्तलखान्यासाठी वापरण्यात येणारे कटिंग मशीन, वजन काटा, सुरी व अन्य साहित्य जप्त केले आहे.
दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी सिद्धेश पेडणेकर यांनी सदर मांसाची तपासणी केली असता ते गोमांस असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी मुदस्सर शेख, रियाज खान (दोघे रा. वाळपई-ठाणे) यांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शेख गोल्ड स्टोरेज यांच्यावरही ३२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
२० दिवसांपूर्वी गोवा-बेळगाव दरम्यान केरी येथील तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मांस जप्त करण्यात आले होते. यापूर्वीही अशाच प्रकारची घटना सदर तपासणी नाक्यावर घडली होती. सत्तरी तालुक्यात अशाप्रकारे बेकायदेशीरपणे गुरांची हत्या करणे व बेकायदा मांस विकण्याचा प्रकार अजूनही सुरू असल्याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेकवेळा पोलिसांनी कारवाई करून कित्येकांना अटक केली. मात्र, हे प्रकार अजूनपर्यंत थांबलेले नाहीत याबद्दल नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे.
गोरक्षाप्रेमींकडून वाळपई पोलिसांचे स्वागत
वाळपई अखिल विश्व व संवर्धन केंद्राचे अध्यक्ष तथा गोरक्षाप्रेमी हनुमंत परब यांनी वाळपई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. वाळपई शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गैरव्यवहार सुरू आहेत. बेकायदेशीपणे गुरांची चोरी करून त्यांची कत्तल करणे व बेकायदेशीरपणे मांस बाजारपेठेमध्ये विकणे अशा घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. पोलिसांनी याबाबत विशेष लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी परब यांनी केली आहे.