५० हजार रुपयांची हमी, इतर अटी लागू
पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २०२३ मध्ये आसगाव येथे छापा टाकून प्रसिद्ध इटालियन डीजे मायकल लॉरेन्स स्टेफेनोनी उर्फ डीजे बबलहेड (३२) व नेल वॉल्टर (२८) या दोघांना अटक केली होती. यातील संशयित डीजे मायकल लाॅरेन्स स्टेफेनोनीला अटकेची माहिती लिखित स्वरूपात दिली नसल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयिताला ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला.
चिवार-हणजूण-आसगाव परिसरात राहणारा डीजे बबलहेड हा अमली पदार्थ तस्करीत सहभाग असल्याची माहिती गुप्तहेरांनी एएनसीला दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक व इतर पथकाने चिवार-हणजूण-आसगाव परिसरातील एका घरावर छापा टाकला. त्या वेळी पोलिसांनी प्रसिद्ध इटालियन डीजे मायकल लॉरेन्स स्टेफेनोनी उर्फ डीजे बबलहेड आणि नेल वॉल्टर (२८) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ५०.२५ लाख रुपये किमतीचे ५० ग्रॅम एलएसडी लिक्विड आणि ५० ग्रॅम चरस ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दीनदयाळनाथ रेडकर यांनी वरील दोघा संशयितांविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.
नियमांचे पालन न केल्याचा कोर्टाचा निर्णय
या प्रकरणी एएनसीने तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. संशयित बबलहेडने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. संशयितातर्फे अॅड. कमलाकांत पोवळेकर यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाड्याचे संदर्भ सादर केले. एएनसीने बबलहेडला अटक करताना त्याची माहिती लिखित स्वरूपात दिली नसल्याचा युक्तिवाद केला. नियमाचे पालन करून ड्रग्जची इन्व्हेंटरी केली नाही. या प्रकरणी न्यायालयाने संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला.