दुचाकीची झाडाला धडक बसून हणजूणमध्ये युवक ठार

अन्य अपघातात जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 mins ago
दुचाकीची झाडाला धडक बसून हणजूणमध्ये युवक ठार

म्हापसा : हणजूणमध्ये झालेल्या दोन वाहन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बडोदा बँकेजवळील झाडाला ठोकर दिल्याने झैरेम्तलूंगा राल्ते (२१, मिझोराम) हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. तर, चार महिन्यांपूर्वी झालेल्या ‘हीट अॅण्ड रन’ अपघातातील जखमी पादचारी उफवल (३५) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी पहाटे ५.३० वा. सुमारास हणजूणमधील बरोडा बँकेजवळ एका फसिनो स्कुटरने रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातात झैरेम्तलूंगा राल्ते हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत युवक हा हणजूण येथील फॅट फीश रेस्टॉरन्टमध्ये कामाला होता. अपघाताचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक साईश किनळेकर व हवालदार ज्ञानेश्वर गवंडी यांनी केला.

दरम्यान, ७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १०.४५ वा. सुमारास हणजूणमधील डिस्को सिंग रेस्टॉरन्टसमोर एका अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत उफवल नामक पादचारी युवक गंभीर जखमी झाला होता. त्याचे गोमेकॉत उपचार सुरू असताना बुधवार, २३ रोजी निधन झाले. अपघाताच्या दिवशीपासून तो बेशुद्धावस्थेत होता. पोलिसांना अद्याप त्याचे संपूर्ण नाव आणि पत्ता समजलेला नाही.

तर, अपघातानंतर पळ ठोकलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध पोलीस हवालदार ज्ञानेश्वर गवंडी यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्निल नाईक हे करीत आहेत. 

हेही वाचा