मडगाव एसजीपीडीए मार्केटनजीक कचर्‍याला आग

प्रदूषण नियंत्रण बोर्डाने कारवाई करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th April, 11:16 pm
मडगाव एसजीपीडीए मार्केटनजीक कचर्‍याला आग

मडगाव : येथील एसजीपीडीए मार्केटनजीक कचर्‍याच्या ढीगाला आग लागल्याची घटना घडली. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारामुळे प्रदूषण झालेले असून याची दखल प्रदूषण नियंत्रण बोर्डाने घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली. स्वच्छता असल्याचे दाखवण्यासाठीच कोणीतरी ही आग लावल्याचा दावाही त्यांनी केला.

मडगाव येथील एसजीपीडीएच्या भाजी मार्केटनजीकच्या खुल्या मैदानाच्या बाजूला कचर्‍याचे मोठे ढीग दिसून येत होते. नागरिकांकडून कचरा उचल करत हा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली होती. या कचर्‍यात प्लास्टिकसह थर्माकोलचाही समावेश होता. शनिवारी सकाळी या कचर्‍याच्या ढीगाला आग लागण्याची घटना घडली. आगीचा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरला. यानंतर मडगाव अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग विझवली. यानंतर शॅडो कौन्सिलचे संयोजक साविओ कुतिन्हो यांनी सांगितले की, मडगावात कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळेच ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसतात. लोकांनी ते दाखवून दिल्यावर त्याला आग लावून सर्व परिसर स्वच्छ असल्याचे दाखवण्यात येते. असाच प्रकार एसजीपीडीए मार्केटनजीक घडला आहे. कोणीतरी ही आग लावल्याने परिसरातील लोकांना त्याचा त्रास झाला. याप्रकरणी एसजीपीडीए, पालिका यांच्यासह गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेत कारवाई करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या प्रश्नावर वेळप्रसंगी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल, असेही सांगितले. 

हेही वाचा