मध्यप्रदेश येथून संशयितास अटक
पणजी : शेअर ट्रेडिंगमध्ये जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून बेतकी- खांडोळा येथील एकाला २.४४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने नीरज राज (५०,मध्यप्रदेश) या संशयिताला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
या प्रकरणी बेतकी - खांडोळा येथील रुद्रेश साखरदांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २५ नोव्हेंबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्याशी वेगवेगळ्या वॉट्सअॅप मोबाईल क्रमांकाच्या, फेसबुक व सोशल मीडियाच्या इतर माध्यमांद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तक्रारदाराला फेसबुक या सोशल मीडियाच्या लिंक पाठवून त्यात सहभागी करून घेतले. त्यानंतर त्याला शेअर ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास लावले. त्या अॅपद्वारे तक्रारदाराला विविध बँकेच्या खात्यात सुमारे २ कोटी ४४ लाख ५९ हजार ४०८ रुपये जमा करण्यास भाग पाडले. काही काळानंतर संबंधित अॅपमधील तक्रारदाराचे खाते ब्लाॅक करण्यात आले. याच दरम्यान फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात धाव घेत आपली सुमारे २ कोटी ४४ लाख ५९ हजार ४०८ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. याच दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात वॉट्सअॅप मोबाईल धारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९ (२) आरडब्ल्यू ३(५)आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ ‘डी’ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान वरील रकमेची ३ लाख रुपये मध्य प्रदेश येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, सायबर विभागाच्या पथकाने मध्य प्रदेश येथे नीरज राज (५०) याला गुरुवारी अटक केली. त्यानंतर संशयिताला शुक्रवारी गोव्यात आणून फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केला. त्यावेळी न्यायालयाने संशयिताला पाच दिवस सायबर विभागाची कोठडी ठोठावली.