म्हापसा सबयार्डमध्ये एफडीएची कारवाई
म्हापसा : येथील मार्केट सबयार्डवर अन्न व औषधे प्रशासनाची तपासणी सुरुच असून इथेफोन लिक्वीड या रसायनामार्फत कृत्रिमरित्या केळी पिकवणाऱ्या एका दुकानदाराला एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईतून जप्त केलेली एक टन केळी नष्ट करण्यात आली.
ही कारवाई शनिवारी २६ रोजी करण्यात आली. म्हापसा मार्केट सबयार्डमध्ये फळे रसायनाचा वापर करुन कृत्रिमरित्या पिकवली जात असल्याचा संशय एफडीएच्या अधिकाऱ्यांना होता. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी गुप्तपणे पाळत ठेवली होती.
यावेळी मेसर्स प्रसाद फ्रुटस् नामक दुकानाच्या गोदामवजा खुल्या जागी इथेफोन लिक्वीड या रसायनाचा वापर करुन केळी पिकवताना एफडीएच्या पथकाने बसवंत बर्मनावर याला रंगेहाथ पकडले. हे रसायन पाण्यात मिसळून नंतर केळीचे घड सदर रसायन मिश्रीत पाण्यात बुडवले जात होते.
दरम्यान, शिवोली व म्हापसा येथील बंगळुरू आयेंगर बेकरीचा व्यवसाय अस्वच्छतेमुळे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तर, आसगाव येथील दोन रेस्टॉरन्टना सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या गुरुवारी व शुक्रवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गलिच्छ जागेत पदार्थ तयार करणारी म्हापशातील दोन ढोकळा उत्पादन आस्थापने बंद केली. तसेच करासवाडा व धारगळ येथील पनीरचे युनिट बंद करण्यात आले. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या आस्थापनांकडून ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सुमारे १ टन केळी जप्त
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी हा सुमारे १ टन केळी जप्त केली. नंतर म्हापसा पालिकेच्या सहाय्याने तो साठा नष्ट करण्यात आला. या गुन्हेगारी कृत्याबद्दल एफडीएकडून संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एफडीएचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, अमित मांद्रेकर व लेनिन डिसा या पथकाने ही कामगिरी केली.