बार्देशमध्ये आठवड्यात पाच जणांचा अपघाती मृत्यू

एक विदेशी, तर चार भारतीय नागरिकांचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
बार्देशमध्ये आठवड्यात पाच जणांचा अपघाती मृत्यू

म्हापसा : बार्देश तालुक्यात गेल्या आठवड्यात ५ जणांचा अपघाती मृत्यू झाला. मयतांमध्ये एक विदेशी तर चार देशी नागरिकांचा समावेश आहे. हे अपघात कळंगुट, कांदोळी, हणजूण व पर्वरी येथे घडले आहेत.
सोमवार दि. २१ रोजी कळंगुट येथील डॉमिनोज पिझ्झाजवळ दुचाकी व पाणीवाहू टँकरमध्ये अपघात झाला. यात नीलेश मिश्रा (३६, रा. कळंगुट व मूळ गुजरात) हा काजूबिया विक्री व्यावसायिक युवक ठार झाला.
हणजूणमधील डिस्को सिंग रेस्टॉरन्ट समोर एका अज्ञात मोटारसायकलच्या धडकेत जखमी झालेल्या उज्ज्वल (३५) या पादचारी युवकाचे २३ रोजी निधन झाले. हा अपघात गेल्या ७ डिसेंबर २०२४ रोजी घडला होता. तेव्हापासून सदर युवक कोमात होता.
शुक्रवार, दि. २५ रोजी हणजूणमध्ये स्वयंअपघातात झैरेम्तलूंगा राल्ते (२१, मिझोराम) हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. फसिनो दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बरोडा बँकेजवळील रस्त्याकडेच्या चिंचेच्या झाडाला दुचाकीची जोरदार धडक बसली. यात युवक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. सदर युवक हणजूणमधीलच एका रेस्टॉरन्टमध्ये कामाला होता.
कांदोळी येथे रेन्ट अ कॅब कारच्या धडकेत हरीष चुनीलाल सोळंकी (८६) या ब्रिटनमधील वयोवृद्ध विदेशी पादचारी पर्यटकाचे निधन झाले. त्यांची पत्नी चंद्रकांता सोळंकी (८१, रा. इंग्लंड) हिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. सदर अपघात शुक्रवारी २५ रोजी सकाळी फिशरमन कोव्ह रेस्टॉरन्टजवळ झाला होता. दरम्यान, सायंकाळी उपचारावेळी हरीष सोळंकी यांचे निधन झाले.
पर्वरीत टेम्पोने चिरडल्याने युवक जागीच ठार
पर्वरी येथे रविवारी (दि.२७) दुपारी कदंब डेपोजवळील राष्ट्रोळी महारुद्र मंदिराच्या बाकड्यावर बसलेल्या उमेश मुट्टागी (सुकूर, ३५) या युवकाला भरधाव टेम्पोने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. सदर युवक हा मंदिराच्या बाकड्यावर बसून मोबाईल पाहत होता. त्याचवेळी अपघातग्रस्त टेम्पोने त्याच्यासह तीन दुचाकींना चिरडले. दरम्यान, उमेश मुट्टागी हा एका आस्थापनात कामाला होता.

हेही वाचा