शिवोलीतील रेस्टॉरन्टमध्ये नेपाळी युवतीवर झाला होता लैंगिक अत्याचार
पणजी : वाडी-शिवोली येथे एका नामांकित रेस्टॉरन्टमध्ये नेपाळी युवतीवर २०२१ मध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पीडित युवती आणि इतर साक्षीदारांची न्यायालयात उलटतपासणी झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवून यातील संशयित रिकेश थापा याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबतचा आदेश जलदगती न्यायालयाचे न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला आहे.
या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित युवतीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पीडित युवती आपल्या दोन दिल्ली निवासी मैत्रिणीसोबत २० डिसेंबर २०२१ रोजी रात्री सदर रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्यावेळी नेपाळ येथील संशयित रिकेश थापा आणि मुस्कान प्रधान या रेस्टॉरंटच्या कामगारांनी तिच्याशी ओळख केली. त्यावेळी तिच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध घातले होते. तिला अस्वस्थ वाटू लागले तसेच तिची शुद्ध हरपल्याचे पाहून त्या दोघांनी तिला रेस्टॉरंटच्या एका बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना २० डिसेंबर २०२१ रोजी पहाटे २ च्या सुमारास घडली होती. त्यानंतर हणजूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी त्यात रस दाखवला नव्हता. त्यामुळे पीडितेच्या मैत्रिणींनी दिल्लीतील एका सामाजिक संस्थेच्या मदतीने गोव्यातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला.
त्यानंतर सदर संस्थेच्या साहाय्याने पणजी महिला पोलिसांत तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन महिला पोलिसांनी भा.दं.सं.च्या ३७६, ३२८, व इतर कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला. त्यानंतर पोलिसांनी संशयित रिकेश थापा आणि मुस्कान प्रधान या दोघांना अटक केली.
या प्रकरणी तपासपूर्ण करून महिला पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर यातील संशयित मुस्कान प्रधान याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली.
संशयित थापाचा जामीन फेटाळला
या प्रकरणातील नेपाळ येथील संशयित रिकेश थापा याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून संशयित थापा याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.