हॉटेलच्या अकाऊंटन्टला अटक
म्हापसा : मार्किसवाडा, कांदोळी येथील इंडी स्टेस् हॉटेलमधील २.५७ लाख रुपये रकमेच्या अफरातफरीचा प्रकार अकाउंटन्टकडूनच घडला. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित आरोपी प्रशील परशुराम रायकर (४०, रा. मुड्डेवाडी साळगाव) याला अटक केली.
हा अफरातफरीचा प्रकार मंगळवार दि. २२ रोजी घडला होता. याप्रकरणी इंडी स्टेस् हॉटेल कंपनीचे मानव संसाधन अधिकारी गणेश नाईक यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
संशयित आरोपीने वरील हॉटेलच्या अकाऊंटमधील २ लाख ५७ हजार २५० रूपये रकमेचा गैरवापर केला. तसेच हा प्रकार समजल्यावर घटनेच्या दिवशी हॉटेल व्यवस्थापनाला कोणतीही माहिती न देता हॉटेलमधून फरार झाला होता.
पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे शनिवारी दुपारी गुन्हा नोंदवून संशयित आरोपी प्रशील रायकर याला सायंकाळी अटक केली. संशयिताविरुद्ध भा.न्या.सं.च्या ३१६(४) कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश कांदोळकर हे करीत आहेत.