वाळपई पोलिसांकडून झाडाझडती : भाडेकरूंची पडताळणी
वाळपई : वाळपई पोलिसांनी रविवारी नागवे व सय्यद नगर येथे कोंम्बिग ऑपरेशन हाती घेतले. यावेळी अनेक ठिकाणी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. यामध्ये ३५ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू असून संशयास्पद आढळल्यास त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे वाळपई पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपाधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद नगर या वाळपई पालिका क्षेत्रातील भागात व नागवे या म्हाऊस पंचायत क्षेत्रात भाडेकरूंच्या कागदपत्रांची तपासणी युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. यासाठी पोलीस स्थानकातर्फे वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते. अनेक गटांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अनेक घरांची पडताळणी केली. यावेळी उपस्थितांकडे आवश्यक कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपधीक्षक दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ११० जणांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. अशाच प्रकारचे कोंबिंग ऑपरेशन होंडा भागातही घेण्यात आले आहे.