म्हापसा पोलिसांची कारवाई : काणका येथे मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
म्हापसा : काणका येथील एका ९ वर्षीय मुलीचे अपहरण तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी स्टेन्ली कार्लोस कुटिन्हो (३६, रा. तिवायवाडा कळंगुट) याला अटक केली. पोलिसांनी १५० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत २४ तासांच्या आत याप्रकरणाचा छडा लावला.
ही घटना गुरुवार, २४ रोजी रात्री ८.१५ ते ८.५० या कालावधीत घडली होती. पीडित मुलगी आपल्या इमारतीच्या तळमजल्यावर खेळत होती. यावेळी संशयित आरोपी तिथे आला. त्याने मुलीला पकडून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. नंतर तिला उचलून पळवून नेण्याचाही प्रयत्न केला.
यावेळी मुलीने आरडाओरड केली असता शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर संशयित जमावाला घाबरुन घटनास्थळावरुन पसार झाला.
म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित मुलीला पोलीस स्थानकात आणून तिचे समुपदेशन करण्यात आले. नंतर तिच्या वडिलांच्या तक्रारीवरुन अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार केली. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये संशयिताचा चेहरा बंदीस्त झाला होता. मात्र, संशयिताने कोणत्या बाजूने पलायन केले याचा ठावठिकाणा लागत नव्हता. पोलीस पथकांनी काणका ते म्हापसा पर्रा व कळंगुट दरम्यानच्या विविध आस्थापने आणि घरांतील एकूण १५० सीसीटीव्ही कॅमेरांची पडताळणी केली.
या फुटेजच्या सहाय्याने संशयिताला म्हापसा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कळंगुटमध्ये पकडून ताब्यात घेतले. नंतर चौकशीअंती संशयित स्टेन्ली कुटिन्हो याला अटक केली. संशयित आरोपीविरुद्ध पोलिसांनी भा.न्या.सं.चे कलम १३७, ३५१, ११८, ६४, ६५, ७४, ७५, ७८, तसेच गोवा बाल कायदा व पोक्सो कायद्यान्वये विनयभंग, अपहरण व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीस निरीक्षक निखील पालेकर, उपनिरीक्षक रविना सावतोडकर, विराज कोरगावकर, यशवंत मांद्रेकर, अजय धुरी, मंगेश पाळणी, हवालदार सुशांत चोपडेकर, प्रकाश पोळेकर, राजेश कांदोळकर, महेंद्र मांद्रेकर, अनिल राठोड, आनंद राठोड, लक्ष्मीकांत नाईक, प्रियेश पेडणेकर व सहकारी पोलिसांनी ही कामगिरी केली.
संशयिताविरोधात यापूर्वी ५ गुन्हे नोंद
संशयित आरोपी स्टेन्ली कुटिन्हो हा सराईत गुन्हेगार आहे. या अगोदर त्याच्याविरोधात ५ गुन्हे कळंगुट पोलिसांत नोंद आहेत. हे गुन्हे संशयिताने २०१८ व २०१९ साली केले अाहेत. स्वत:ची आई व लहान भावाला मारहाणीच्या गुन्ह्यात त्याची गेल्यावर्षी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तर, इतर खटल्यांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.