दामू नाईक; पक्ष संघटना अधिकाधिक बळकट करण्याचाही निर्धार
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोमंतकीय जनतेने राज्यातील भाजप उमेदवारांना ५१.६८ टक्के मते दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भाजप सरकार दर्जेदार कामगिरी करत आहे. त्यामुळेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ५२ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतील यावर आपला ठाम विश्वास आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी रविवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्षपद म्हणून शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी आपण राबवत असलेल्या अनेक उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाला प्रत्येक मतदारसंघात बळकट करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्याचसाठी आपण प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास सुरुवात केली. कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आपण प्रत्येक मतदारसंघातील तळागाळातील भाजप कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून माझी आणि पक्षाची भूमिका त्यांच्यासमोर मांडत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य पसरत आहे. आगामी काळात जिल्हा पंचायत, पालिका आणि विधानसभा निवडणुकांना आम्हाला सामोरे जायचे आहे. या सर्वच निवडणुका स्वबळावर जिंकण्याच्या निर्धारानेच आपण काम करत आहे, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले.
राज्यभरातील जनतेचे प्रलंबित प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी आहे. गेल्या शंभर दिवसांत अनेकांनी गटागटांनी आपापले प्रलंबित प्रश्न माझ्यासमोर मांडले. त्यांचे प्रश्न सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न मी करत आहे. पुढील काळातही हे प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
दुरावलेल्यांना पुन्हा पक्षात आणणार!
विविध कारणांमुळे पक्षापासून दुरावलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न आपण करत आहे. २०२७ मध्ये घवघवीत यश मिळवून राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करण्याचा निर्धार सर्वच कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यात जुन्या कार्यकर्त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण राहणार अाहे, असेही दामू नाईक यांनी स्पष्ट केले.