पर्वरीत टेम्पोने तरुणाला चिरडले; कुठ्ठाळी, केप्यात दुचाकीस्वार ठार
पर्वरीतील कदंब डेपोनजीक अपघातात तरुणाचा बळी घेऊन रस्त्यावर उलटलेला टेम्पो. इनसेटमध्ये उमेश मुट्टागी.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पर्वरी/वास्को : राज्यात रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. पर्वरीत टेम्पोने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. कुठ्ठाळीत कारने दुचाकीला मागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागले, तर आंबावली केपे येथे जीप आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
पर्वरी येथील कदंब महामंडळाच्या डेपोनजीक वेताळ राष्ट्रोळी हनुमान गणपती मंदिराजवळ रविवारी सकाळी ११.३० वा. मालवाहू टेम्पो वेताळ राष्ट्रोळी हनुमान गणपती मंदिराच्या भिंतीला धडक देऊन रस्त्यावर उलटला. टेम्पो पर्वरी येथील होली मेरी चर्चकडून पैठण येथे जात होता. मंदिराजवळ टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. टेम्पो आपली दिशा सोडून विरुद्ध दिशेला आला. टेम्पोची धडक मंदिराच्या भिंतीला बसली. मंदिराबाहेर बाकावर बसलेल्या उमेश मुट्टागी (३५, सुकुर-पर्वरी) यांना बसली. नंतर टेम्पो रस्त्यावर उलटला. या अपघातात दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. अपघातात गंभीर जखमी उमेश यांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरंनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी टेम्पो चालक रियान शेख (२८, झुवारीनगर वास्को) याला अटक केली.
निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शिरोडकर, हवालदार श्रीपाद तेली व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हवालदार श्रीपाद तेली यांनी पंचनामा केला. उपनिरीक्षक सचिन शिरोडकर यांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.
कुठ्ठाळी येथे अपघातात स्कूटरचालकाचा मृत्यू
कुठ्ठाळी येथील टोयाेटा शोरूमसमोरच्या महामार्गावर रविवारी सकाळी चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा मुंबई येथील परंतु आता चांदर येथे राहणारा नेव्हील मस्कारेन्हस (२५) हा चारचाकी वाहनाने पणजीहून मडगावकडे चालला होता. तो केसरव्हाळ–कुठ्ठाळीच्या टोयाेटा शोरूमसमोरच्या महामार्गावर पोहोचला असता त्याच्या वाहनाची धडक समोरून चाललेल्या दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकीचालक बसाप्पा गिराप्पा मेट्री (६०, दिकरपाली-दवर्ली) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ताबडतोब गोमेकॉत दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून नेव्हील याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
उपनिरीक्षक महेश भोमकर पुढील तपास करत आहेत.
केपे येथे जीपची दुचाकीला धडक
रविवारी दिवसभरातील राज्यातील तिसरा अपघात आंबावली केपे येथे झाला. आंबावली केपे येथे एका जीपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. केपे पोलीस पुढील तपास करत आहेत.