पिंपळामळ येथील बांधकामावरून एकमेकात दोन गट भिडले

खोतीगाव ग्रामसभा गाजली : समिती स्थापन करण्याचा निर्णय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18 hours ago
पिंपळामळ येथील बांधकामावरून एकमेकात दोन गट भिडले

काणकोण : खोतीगाव पंचायतीची ग्रामसभा रविवार, दि. २७ एप्रिल रोजी वादळी ठरली. या ग्रामसभेत पिंपळामळ येथील वनखात्याच्या बांधकामासंबंधीसारख्या संवेदनशील विषयावर चर्चा होणार असल्याने काणकोण पोलीस तैनात करण्यात आले होते. ग्रामसभा सुरू असतानाच दोन गट एकमेकांशी भिडले, ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वृंदा वेळीप होत्या. यावेळी काणकोणचे आमदार आणि सभापती रमेश तवडकर, उपसरपंच पूनम गावकर, पंच जयेश गावकर, कृष्णा गावकर, आनंदू देसाई, प्रशांत वेळीप आणि पंचायत सचिव वारीक उपस्थित होते.
ग्रामसभा सुरू असताना, पिंपळामळ येथील वनखात्याच्या बांधकामासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि यामुळे वातावरण तापले. दया गावकर यांच्या समर्थनात असलेला एक गट आणि त्याच्या विरोधात असलेला दुसरा गट भिडले. शेवटी, सभापती रमेश तवडकर यांनी पिंपळामळ येथील बांधकामासंबंधी वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि यासाठी एक कमिटी स्थापन करून त्या समितीद्वारे प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला.
या दरम्यान, दया गावकर यांनी वन खात्याच्या कामावर बंदी घालण्याची मागणी केली आणि नंतर पुढील कृती घेण्याचे निर्देश दिले. यावेळी, ग्रामसभा सदस्य दत्ता वेळीप, अशोक गावकर, पाईक वेळीप, गेनू वेळीप, करिष्मा वेळीप, कल्पेश गावकर, भिवा गावकर, देविदास गावकर, जयेश वेळीप, शाबू गावकर, श्रीकांत गावकर यांच्याद्वारे चर्चेत भाग घेतला.
यावेळी सुधाकर गावकर यांनी शैक्षणिक दर्जा सुधारण्याची आणि गावात स्नेहसंमेलन व नाटकांच्या आयोजनाच्या वेळी खेळात होणारे गैरव्यवसाय बंद करण्याची मागणी केली.
ग्रामसभेला म्हटले ‘थर्ड क्लास’
सरपंच वृंदा वेळीप यांनी काही प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली नसल्याने दया गावकर यांनी निषेध व्यक्त केला. यावर, कल्पेश गावकर यांनी सदर ग्रामसभेचा उल्लेख ‘थर्ड क्लास’ असा केला. यावर दुसऱ्या गटाने कल्पेश गावकर यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली. गदारोळातच ग्रामसभा संपली.