नववीत नापास होणाऱ्यांना ‘खासगी’ म्हणून जाता येणार दहावीत!

‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ जमा केल्यानंतर बोर्ड घेणार जबाबदारी


13 hours ago
नववीत नापास होणाऱ्यांना ‘खासगी’ म्हणून जाता येणार दहावीत!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : इयत्ता नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नववीत पास न होता दहावीची परीक्षा देण्यासह आयटीआय किंंवा कौशल्य विकासासंदर्भातील इतर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संंधी गोवा बोर्डाने प्राप्त करून दिली आहे. त्यासाठी नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्याने शाळा सोडल्याचा दाखला (लिव्हिंग सर्टिफिकेट) देण्यासह खासगी उमेदवार म्हणून बोर्डाकडे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्याची पूर्ण जबाबदारी गोवा बोर्ड घेईल, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी रविवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
राज्यात यंंदापासून दहावीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) कार्यवाही होणार आहे. त्यासाठी गोवा बोर्डकडून दोन नियम ठरवण्यात आले आहेत. पहिल्या नियमानुसार, नववीत नापास झालेले विद्यार्थी ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ देणार नसतील, तर त्यांना दहावीत गेल्यानंतर नववीत नापास झालेले विषय सोडवावे लागतील. दुसऱ्या नियमानुसार, नापास झालेले जे विद्यार्थी ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ बोर्डाकडे जमा करतील त्यांना दहावीची परीक्षा देता येईल. ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीचे वर्ग आणि प्रात्यक्षिकांनाही उपस्थित राहता येईल. नववीत अनेकदा नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठीच दुसरा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देण्यासह कौशल्य विकासासंदर्भातील इतर कोर्सही करता येऊ शकतात, असे भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.
नववीत नापास झाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांची दोन-दोन वर्षे वाया गेली आहेत. आतासुद्धा नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीत जाण्यासह परीक्षेला बसण्याची संंधी मिळणार असली तरी त्यांना पास व्हावेच लागणार आहे. नववीच्या विषयात जोपर्यंत ते पास होत नाहीत, तोपर्यंत दहावीचा त्यांचा निकाल जाहीर केला जाणार नाही. पण, ‘खासगी उमेदवार’ म्हणून नोंंदणी केल्यास त्यांना नववी पास होण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी नमूद केले.
कौशल्य विकासाला चालना देण्याचे प्रयत्न
दहावीसाठी खासगी उमेदवार म्हणून नोंदणी झालेल्या विद्यार्थ्याला दहावीच्या वर्गांना बसण्याची सक्ती नाही. त्यामुळे आयटीआय किंवा इतर संंस्थेमधून कौशल्य विकासासंदर्भातील इतर अभ्यासक्रमही पूर्ण करण्याची संंधी त्याला प्राप्त होणार आहे.
आठवी पास झाल्यानंतरही आयटीआयमध्ये काही अभ्यासक्रम आहेत. शिवाय इतर खासगी संंस्थामध्येही संंगणक प्रशिक्षणासह इतर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते करणे या विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे.