सत्तरीतील देशप्रेमी नागरिकांतर्फे पाकिस्तानचा निषेध

सत्तरीत निषेध सभेमध्ये सहभागी झालेले देशप्रेमी नागरिक.
वाळपई : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पहलगाम येथील भारतीय पर्यटकांवर अमानुष हल्ला करून २८ जणांना दुर्दैवी मृत्यू आला. अतिरेक्यांच्या या भ्याड कृत्यामुळे आज देश हादरलेला आहे. या २८ शहिदांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल तर भारताने पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावे. भारतीय नागरिक सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. पहलगाम येथे आतंकवाद्यांकडून झालेला भ्याड हल्ला उद्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये होऊ शकतो. यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.
सत्तरी तालुक्यातील देशप्रेमी नागरिकांनी शनिवारी वाळपई येथील शहीद स्तंभ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभा व शहिदांना श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते अॅड. शिवाजी देसाई यांनी पहलगाम येथील घटना दुर्दैवी आहे. यातून अतिरेक्यांनी देशासमोर आव्हान निर्माण केले आहे. याला तोंड देण्यासाठी देशातील नागरिकांनी निर्धारपूर्वक लढा देण्यासाठी सज्ज रहावे, अशी मागणी केली.
दया प्रभुतेंडुलकर यांनी पहलगाम येथील प्रकार हा देशामध्ये कुठेही घडू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने जागृत राहणे गरजेचे आहे. दीपाजी राणे सरदेसाई यांनी सरकारने पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारची तडजोड न करता पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची मागणी केली. यावेळी समाज कार्यकर्ते गौरीश गावस, उदय बर्वे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
आज देशांमध्ये राहणारे अनेक घटक हिंदू धर्म मानण्यास तयार नाहीत. अशा नागरिकांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. आजचा दिन हा संकल्प दिन म्हणून पाळण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. अशा विचारांच्या विरोधात असलेल्या नागरिकांसमोर कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका. आर्थिक स्तरावर त्यांची कोंडी करा. - मिलिंद गाडगीळ, समाजकार्यकर्ते