दक्षिण गोव्यात ९१.२३ टक्के मतदार अर्जांचे डिजिटायझेशन!

जिल्हाधिकार्‍यांची माहिती : दावे, हरकतींसाठी १६ डिसेंबरपासून महिनाभर मुदत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
दक्षिण गोव्यात ९१.२३ टक्के मतदार अर्जांचे डिजिटायझेशन!

मडगाव : दक्षिण गोव्यात (South Goa) विशेष मतदार पडताळणी (SIR) प्रक्रियेत ६,३२,०१० इतक्या मतदारांना अर्जांचे वाटप झाले. त्यातील ५,७६,५८३ इतक्या मतदारांचे अर्ज मिळाले आहेत. याशिवाय मृत्यू झालेले, स्थलांतरित, उपस्थित नसणे यासह इतर कारणास्तव ५५,४२७ मतदार आहेत. ही संख्या ८.७७ टक्के इतकी आहे. ९१.२३ टक्के मतदारांचे अर्ज भरण्यात आले आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस (Egna Cleetus) यांनी दिली.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी क्लिटस यांनी शुक्रवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. त्यानंतर मतदार पुनर्रीक्षण २०२६ ची प्रक्रिया औपचारिकपणे पुढील टप्प्यात पोहोचली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हाधिकारी क्लिटस यांनी सांगितले की, मतदार पुनरीक्षण मोहिमेदरम्यान निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या अंतिम मुदतीत बूथ लेव्हल अधिकार्‍यांना अर्ज प्राप्त झाले. हे अर्ज पडताळून त्यांचे डिजिटायझेशन केले गेले. अर्जांची छाननी केल्यानंतर, जिल्हा निवडणूक अधिकारी क्लिटस यांनी सांगितले की, अर्ज न मिळालेल्यात निवासस्थानी अनुपस्थित, स्थलांतरित, मृत्यू आणि दुहेरी नोंदींचा समावेश आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणाचा भाग म्हणून पुढील पडताळणी आणि सुधारणात्मक कारवाईसाठी ही नावे ओळखण्यात आली आहेत.

पारदर्शकता राखण्यास मदत!
- मतदार पुनरीक्षणादरम्यान केलेल्या छाननीमुळे दक्षिण गोव्यातील प्रियोळ ते काणकोण अशा सर्व २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये ५५,४२७ एएसडीडी प्रकरणे ओळखण्यास मदत झाली आहे.
- पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पुढील टप्प्यात मतदारांना मदत करण्यास सर्व राजकीय पक्षांना तपशीलवार याद्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
- या मतदार पुनरीक्षण प्रक्रियेबाबत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत १६ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत राहील.
- मतदार त्यांच्या संबंधित मतदार सुविधा केंद्रांवर किंवा त्यांच्या मतदान क्षेत्रात नियुक्त केलेल्या बीएलओंकडे समावेश, दुरुस्ती, वगळणे किंवा आक्षेप घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात, असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा