सहा दिवसांतील आगीची तिसरी घटना.

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात आगीच्या घटनांची मालिका सुरू झाली असून, गोवा 'ज्वलनशील' बनत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. विशेषत: गेल्या सहा दिवसांत आगीची ही तिसरी मोठी घटना आहे. अग्निसुरक्षेशी संबंधित नियमांची उघडपणे होणारी पायमल्ली यामुळे नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आली आहे.
हडफडे क्लब दुर्घटनेपासून वेर्णातील भंगारअड्ड्यापर्यंत आगीचे तांडव
१. हडफडे क्लब दुर्घटना: मध्यरात्री 'बर्च बाय रोमिओ लेन' या क्लबमध्ये 'कोल्ड पायरो' (Cold Pyro) मुळे लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा हकनाक बळी गेला होता.
२. कला अकादमीतील आग: त्यानंतर पणजीतील कला अकादमीच्या आवारात 'सेरेंडिपीटी' महोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या सजावटीच्या साहित्यावर वेल्डिंगची ठिणगी पडून आग लागल्याची घटना घडली. येथे सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून अवघ्या चार मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
३. वेर्णा भंगार अड्ड्याला आग: आज शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका खाजगी भंगार अड्ड्याला आग लागली. यात झालेल्या नुकसानीचा अंदाज अद्याप समोर आलेला नाही.
आगीच्या घटनांची कारणे आणि नुकसानीचा धोका
गेल्या काही काळात घडलेल्या आगीच्या घटना पाहिल्यास त्यामागे प्रामुख्याने अग्निसुरक्षेचे तोडके पडलेले उपाय आणि संबंधित नियमांची उघडपणे सुरू असलेली पायमल्ली ही कारणे हमखास आढळून येतात. क्लबमध्ये सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणे असो किंवा वेल्डिंगचे काम करताना ज्वलनशील साहित्याजवळ काळजी न घेणे असो, प्रत्येक वेळी मानवी त्रुटीच मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देत आहेत.
भंगार अड्ड्यांवरील वाढत्या घटना
औद्योगिक वसाहतींमधील भंगार अड्ड्यांवर आग लागण्याच्या घटना चिंताजनक आहेत. केवळ वेर्णाच नव्हे, तर यापूर्वी १९ नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबर रोजी सांकवाळ-झुआरीनगर परिसरातील भंगार अड्ड्यांना आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या खडतर मेहनतीनंतर या दोन्ही ठिकाणी लागलेली आग नियंत्रणात आणली. त्यांच्या प्रसंगावधानाने ही आग बाजूच्या अड्ड्यांपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा तिथेही जीवितहानीचा मोठा धोका होता.
गुन्हेगारी रोखण्यासाठी भंगार अड्ड्यांची तपासणी
दरम्यान, भंगार अड्ड्यांचा मालमत्तेशी संबंधित गुन्हेगारीत सहभाग असल्याच्या तक्रारीनंतर गोवा पोलिसांनी या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. शनिवार ८ नोव्हेंबर रोजी उत्तर गोवा पोलिसांनी आपल्या हद्दीतील १०५ भंगार अड्ड्यांच्या मालकांची आणि २२१ भंगार साहित्य गोळा करणाऱ्यांची तपासणी केली आहे.
उत्तर गोव्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी माहिती दिली होती की, चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी या आस्थापनांचा वापर होत असल्याचे मागील तपासामध्ये दिसून आले आहे. त्यामुळे मालमत्ता-संबंधित गुन्हे रोखण्यासाठी ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या भंगार अड्ड्यांमध्ये स्थलांतरित कामगारांची मोठी संख्या असते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचालींची माहिती ११२ या आपत्कालीन क्रमांकावर द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले होते. तसेच भंगार अड्ड्यात ज्वलनशील पदार्थ इत्यादि न ठेवण्याच्या सुचनाही केली होती.
सध्या सुरू असलेल्या आगीच्या घटना आणि नियमांचे उल्लंघन पाहता, प्रशासनाने केवळ भंगार अड्ड्यांवरच नव्हे, तर सर्व औद्योगिक आणि सार्वजनिक आस्थापनांवर अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करावी, अशी मागणी जोर धरत आहे.