
मडगाव: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि 'आप' (Aam Aadmi Party) पक्षांवर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप पैसे आणि कार्यकर्त्यांचा वापर करून विरोधी पक्षाला फोडण्याचे प्रयत्न करत आहे, तर 'आप' पक्षबदलूंचे सहकार्य घेत निवडणुकीत उतरला आहे, असे सरदेसाई म्हणाले. अरविंद केजरीवाल गोव्यात प्रचारासाठी आले तरी फारसा फरक पडणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
फातोर्डा येथील विकासकामांच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी भाजप आणि 'आप'वर निशाणा साधला. अधिकार नसतानाही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत मोठे नेते प्रचारात सहभाग घेत असतील, तर त्याचा अर्थ ते देखील मतविभागणीसाठी (Vote Division) आले असल्याची शक्यता आहे, असे सरदेसाई म्हणाले.
गोवा फॉरवर्डवर परिणाम नाही
गोवा फॉरवर्ड नऊ मतदारसंघांत निवडणूक लढवत आहे. केजरीवाल गोव्यात प्रचारासाठी आले म्हणून गोवा फॉरवर्डवर कोणताही परिणाम होणार नाही. 'आप'चे वरिष्ठ नेते त्यांना सोडून जात आहेत. 'आप'च्या आतिशी येथे राहून काम पाहत आहेत, मात्र त्यांनी पक्षबदलूंची मदत घेतलेली आहे. बाबाशान यांच्याकडून 'आप'च्या उमेदवाराला पाठिंबा दिला जात असताना कुणीही काहीही बोलत नाही. ते एका बाजूला पक्षबदलूंची मदत घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पक्षबदलूंना घेणार नसल्याचे सांगत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
'बर्च क्लब' दुर्घटनेवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
बर्च क्लबच्या आगीत २५ जणांचा बळी गेला. या घटनेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीचा वापर केला जात आहे, असा गंभीर आरोप सरदेसाई यांनी केला. नाईट क्लबला परवानगीच देऊ शकत नसतानाही राज्यात अनेक नाईट क्लब सुरू आहेत. यात सत्ताधारी पक्षाचे नेतेही सहभागी आहेत, असा आरोप करत त्यांनी "सरकारने आता 'माझे क्लब योजना' आणावी," असा उपहासात्मक टोला लगावला.
मनोज परब म्हणजे 'प्रँक'
रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांच्यावर बोलताना सरदेसाई म्हणाले, "मनोज परब म्हणजे एक 'प्रँक' आहे, त्यांच्यावर जास्त काय बोलायचे." त्यांनी स्वतःच सांगितले की आपण गोमंतकीय जनतेचा प्रँक केला, गोमंतकीय लोकांच्या भावनांशी खेळ केला. त्यांना जास्त गंभीरपणे घेण्याची गरज नाही. ते युतीसाठी गंभीर नव्हते आणि प्रँक करणाऱ्यांसोबत युती कशी होणार, असे सांगत त्यांनी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष युतीसाठी इच्छुकच नव्हता, असे स्पष्ट केले.
कोणत्याही निवडणुका जवळ आल्यानंतर भाजप सरकारी नोकऱ्या आणि बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा मुद्दा वर काढते. २०२० पासूनच्या निवडणुकांतून याचा फायदा करून घेत असल्याचे दिसून येते. नोकऱ्यांच्या जाहिराती काढायच्या आणि त्यांची विक्री करायची, त्यासाठी विविध मंडळांचा वापर 'मार्केटिंग युनिट' सारखा करायचा, हे भाजपकडून सुरू आहे, असे आमदार सरदेसाई म्हणाले.
आरडीए निधी जिल्हा पंचायतीकडे वळवणार
काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या युतीचे सरकार झाल्यास आरडीएकडील निधी जिल्हा पंचायतीकडे वळवण्यात येतील, हे आश्वासन दिलेले आहे. जिल्हा भवन उभारणे आणि त्याच्या बांधकामाचे पैसे खाणे हा आमचा उद्देश नाही, तर जिल्हा पंचायतीला कायद्यानुसार त्यांचे हक्क व अधिकार देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे विजय सरदेसाई म्हणाले.