जानेवारी ते मार्च, २०२६ पर्यंत होणार गणना

पणजी : अखिल भारतीय व्याघ्र गणनेचा (All India Tiger Estimation (AITE)) भाग म्हणून जानेवारी ते मार्च, २०२६ या कालावधीत गोव्यात (Goa) तीन महिन्यांची विस्तृत वन्यजीव गणना (Wildlife census) करण्यात येणार आहे. त्यात वाघांकडे विशेष लक्ष असणार आहे.
देशव्यापी मोठ्या मांजरीचे मूल्यांकन आता सहाव्या चक्रात आहे. त्यात भू-सर्वेक्षण, उपग्रह तंत्रज्ञान आणि एआय-सक्षम कॅमेरा ट्रॅपिंग यांचा समावेश असलेल्या तीन चरणीय पद्धतींचा समावेश असेल. गोव्याच्या वन कर्मचाऱ्यांसाठी यापू्र्वीच प्रशिक्षण सुरू आहे. जे वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे निरीक्षण करणारी नोडल संस्था यांच्या तज्ज्ञांद्वारे आयोजित केले जाते.
मोले येथे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातून गोव्यातील वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांना भारतीय वन्य जीव संस्था (WII) व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकारिणीतील (NTCA) तज्ज्ञांनी प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. गुरुवारी यासंदर्भात एक सत्रही घेण्यात आले.
२००६ मध्ये सुरू झालेल्या एआयटीइने आतापर्यंत पाच चक्रे पूर्ण केली आहेत. २००६, २०१०, २०१४, २०१८ व २०२२ मध्ये झालेल्या या चक्रांमध्ये गोवा सहभागी झाला आहे. २०२२ च्या गणनेत गोव्यात ५ वाघांची नोंद झाली.
गोव्यात गणनेसाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्यात क्षेत्रीय पथके वाघांचे पंजे, ओरखडे, विखुरलेले नमुने आणि शिकारीचे अवशेष इत्यादी अप्रत्यक्ष पुराव्यांचे दस्तऐवजीकरण करणार आहेत. त्याचबरोबर वनस्पती घनतेचे मॅपिंग देखील करणार आहेत. वनक्षेत्रातील मानवी वर्दळीचीही नोंद करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात उपग्रह एकत्रीकरण व रिमोट सेन्सिंगचा समावेश आहे. त्यात वनक्षेत्र, भूप्रदेशाची वैशिष्ट्ये, पाण्याचे स्त्रोत व संभाव्य मानवी अतिक्रमण यांचे विश्लेषण करण्यासाठी उपग्रह डेटाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रमुख अधिवास व वन्यजीस कॉरिडॉर ओळखण्यास मदत होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात कॅमेरा ट्रॅप आणि एआय-आधारित मााहिती मिळवण्यात येणार. भू-सर्वेक्षणादरम्यान ओळखल्या जाणाऱ्या पायवाटा, कड्या आणि पाणवठ्यांसह मोक्याच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात येणार. वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यासाठी प्रत्येक कॅमेरा युनिट २५ दिवस काम करणार आहे.
त्यानंतर वाघांना त्यांच्या पट्ट्यांच्या नमुन्यांद्वारे ओळखण्यासाठी सक्षम सॉफ्टवेअर वापरून प्रतिमांवर प्रक्रिया केली जाणार आहे. २००२ आणि २००६ च्या व्याघ्र गणनेत गोव्यात वाघांचे अस्तित्व दिसले नाही. २०१० च्या गणनेत पाच वाघ आढळले. बिबट्या आणि रानकुत्र्यांच्या संख्येत वाढ दिसून आली. २०१४ मध्ये ही संख्या स्थिर राहिली. २०१८ मध्ये ३ वाघ सापडले तर २०२२ मध्ये ही संख्या पुन्हा ५ झाली.