गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी : राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे

राज्यसभेत केली मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी : राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे

पणजी : गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गांची (Goa–Belagavi National Highways) स्थिती सुधारण्याची मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे (Member of Parliament (Rajya Sabha) Sadanand Shet Tanavade) यांनी राज्यसभेत केली. एक महामार्ग अनमोड घाटातून जातो आणि दुसरा चोर्ला घाटातून जातो. हे महामार्ग गोवा व कर्नाटक या दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाचे असून, दररोज प्रवासी, शेती उत्पादने व आवश्यक वस्तूंची वाहतूक या रस्त्यांवर होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शास आणून दिले.  

रस्त्यांचे अनेक भाग खराब स्थितीत आहेत. घाटावरील हे रस्ते अरूंद असून, भूस्खलन होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात त्यामुळे अनेक वेळा वाहतूक खोळंबते. अलिकडे पावसाळ्यात अनमोड घाटात काही भाग कोसळले होते. त्यामुळे बराच काळ वाहतूक बंद पडली होती व प्रवासी अनेक तास व दिवस अडकून पडले होते. हा रस्ता जंगल व डोंगराळ भागातून जातो. बेळगावला पोहोचण्यासाठी अन्य कोणताही पर्यायी मार्ग नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते व आर्थ‌िक नुकसानही होत असल्याचे खासदार तानावडे यांनी सभागृहात स्पष्ट केले. 

तानावडे पुढे म्हणाले की, वैद्यकीय, शैक्षणिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक गरजांसाठी गोव्याचे बेळगावीशी मजबूत संबंध आहेत. लोक उपचार, ‌शिक्षण, खरेदी आणि व्यवसाय इत्यादी कारणांसाठी  वारंवार तेथे जातात. गोव्यातील जवळपास ८० टक्के भाज्या आणि फळे या मार्गांनी राज्यात येतात.

नवीन वर्ष जवळ येत असताना, सुरळीत वाहतुकीसाठी व कोणत्याही व्यत्ययाविना आवश्यक वस्तूंचा पुरवठा गोव्यात होण्यासाठी या रस्त्यांची डागडुजी प्राधान्यक्रमाने हाती घेणे गरजेचे आहे. 

तानावडे यांनी सरकारकडे या महामार्गांची दुरुस्ती त्वरीत करण्याची मागणी केली. घाटात होणारे भूस्खलन, अपघात यांमुळे वाहतूक जास्त काळ खोळंबून राहू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची व त्यासाठी जे काही करावे लागेल ते करावे अशी मागणी केली. गोवा, कर्नाटक या राज्यांसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या या महार्गांवरील वाहतूक सुरळीत व्हावी, याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत केली. 

हेही वाचा