जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप-मगोपचा विजय निश्चित : दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

दीपक ढवळीकर म्हणाले-युतीला ४५ ते ५० टक्के मते मिळतील

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप-मगोपचा विजय निश्चित : दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आणि मगो युतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला. युतीचे ४३ उमेदवार उभे असून, भाजपने यंदा ८० टक्के नवे उमेदवार दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारने केलेल्या विकास कामांमुळे सर्व जागांवर आम्ही बहुमताने जिंकणार, असे मत त्यांनी मांडले. शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, सिद्धार्थ कुंकळकर आणि अनंत नाईक आदी उपस्थित होते.

दामू नाईक म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप ४० जागांवर तर मगोप ३ जागांवर निवडणूक लढवत आहे. उर्वरित ७ जागांवर आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार आहोत. राज्यातील जनतेने मागील काही वर्षांत डबल इंजिन सरकारने केलेला विकास पाहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत विकास हाच खरा मुद्दा असेल आणि युतीचा प्रचंड बहुमताने विजय होईल, अशी आमची खात्री आहे.

नाईक यांनी सांगितले की, आमच्या उमेदवारांनी प्रचाराची पहिली फेरी याआधीच पूर्ण केली आहे. उमेदवार घरोघरी जाऊन पक्षाने केलेली कामे लोकांना समजावून सांगत आहेत आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील भाजपचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. यंदा उमेदवार निवडताना कोणताही त्रास झाला नाही. ८० टक्के नवे चेहरे असले तरी आधीचे बहुतेक सदस्य नवीन उमेदवारांसाठी काम करत आहेत.

पक्षाला गृहीत धरू नये

भाजपमध्ये शिस्त आणि संघटनेला महत्त्व आहे. पक्षात सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे. पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात येणार आहे. कुणीही पक्षाला गृहीत धरू नये, असा इशारा दामू नाईक यांनी दिला.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीतही युती

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले की, जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधी पक्ष कमजोर आहेत. या निवडणुकीत भाजप-मगोप युतीला ४५ ते ५० टक्के मते मिळतील. तसेच, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजप आणि मगोपची युती असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा