बर्च क्लब दुर्घटना : कराराची बोगस प्रत तयार करून मिळवले परवाने

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
बर्च क्लब दुर्घटना : कराराची बोगस प्रत तयार करून मिळवले परवाने

पणजी : थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या लुथरा बंधूंनी जागेच्या कराराची बोगस प्रत तयार करून विविध परवाने घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे आग लागलेल्या ‘बर्च बाय रोमिओ लेन’ प्रकरणी मालक लुथरा बंधूंसह परवाने दिलेले अधिकारीही गोत्यात येणार आहेत.

‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’ला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला शनिवारी एक आठवडा पूर्ण होत आहे. थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतल्याने क्लबचे मालक सौरभ व गौरव लुथरा यांना लवकरच गोव्यात आणण्यात येणार आहे. दिल्ली न्यायालयाने त्यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक करणे गोवा पोलिसांना सहज शक्य झाले. त्यांना अटक झाल्यानंतर दुर्घटनेच्या चौकशीला आणखी वेग येईल.

अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव

शनिवारी रात्री क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांना मरण आले. या दुर्घटनेनंतर पहाटेच लुथरा बंधू विमानाने थायलंडला पळाले होते. क्लबमध्ये आवश्यक स्वरूपाची आगप्रतिबंधक यंत्रणा नव्हती. पंचायतीने दिलेल्या व्यापारी परवान्यावरच इतर सर्व परवाने देण्यात आले होते. बर्च बाय रोमिओ लेनला बांधकाम परवाना नव्हता, फक्त व्यापारी परवाना होता, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. तसेच मूळ करारात आग लागलेल्या ठिकाणाचा सर्व्हे क्रमांक नव्हता. मूळ करार पत्रात बदल करून नंतर परवाने मिळवले असल्याचे देखील उघड झाले आहे.

शेतजमिनीचा बनावट व्यवहार

१) ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबची जागा ही मूळ कुळाची शेतजमीन होती. क्लब उभारण्यासाठी लुथरा बंधूंनी विक्री कराराची बोगस प्रत केली व सर्व परवाने मिळवले.

२) यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करण्याबाबतही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची संधी सरकारला आहे.

३) घटनेच्या चौकशीसाठी सरकारने दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. दंडाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर आगीच्या कारणासह क्लबच्या गैरव्यवहारांवर प्रकाश पडेल.

हेही वाचा