
मडगाव : जिल्हा पंचायत निवडणुकीत (Zilla Panchayat Election) सहभाग घेणे म्हणजे नजीकच्या लोकांशी शत्रुत्व घेण्यासारखे आहे. याआधीच्या निवडणुकांतून आपण हे शिकलेलो असल्याने; या जिल्हा पंचायत निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतलेला नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीत जे निवडून येतील, ते आमचे उमेदवार असतील, असे माजी मंत्री चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी सांगितले.
माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी वार्का येथे पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढायची असल्यास जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेऊ नये. या निवडणुकीत उगाचच काही लोकांचा विरोध पत्करावा लागतो. त्याच लोकांमुळे विधानसभेत फरक पडत असतो. आपचे नेते अरविंद केजरीवाल गोव्यात आले व प्रचार केला म्हणून कोणताही फरक पडणार नाही.
गोव्यात आपणही दोन वेळा पक्ष स्थापन केलेले होते. पक्ष स्थापन केल्यास निधीची कमतरताही भासते व दुसर्या पक्षांशी जुळवून घेण्याची गरज पडते. राज्यातील प्रत्येक मतदारसंघांत 3 ते 4 हजार मतदार आपणासोबत आहेत. वयाच्या 40 व्या वर्षी आपण पहिल्यांदा आमदार व मुख्यमंत्रीही झालो होतो. सर्वधर्मीय लोकांकडून आपणास पाठिंबा मिळालेला आहे. इतक्या वर्षांत राजकारणात लोकांसाठी काम केले, स्वार्थासाठी काम केलेले नाही, असे चर्चिल यांनी सांगितले.
बाणावली मतदारसंघात आपण जो विकास केलेला होता, त्यानंतर कोणताही विकास झालेला नाही. आपण केलेल्या कामांना पुढे नेण्याचे कामही आमदाराने केलेले नाही. बाणावलीत आरोग्य केंद्र स्थापनेसाठी 12 कोटींचा निधी आणला होता पण आता ते आरोग्य केंद्र होणार का नाही ते माहीत नाही. निवडणूक नजीक आल्यानंतर आमदारकीच्या निवडणुकीबाबत निर्णय घेणार, असे चर्चिल आलेमाव म्हणाले.
क्लब रात्रभर कसे सुरू राहतात ? : चर्चिल
राज्यात लग्नसमारंभ व इतर सोहळ्यांना संगीत रात्री 11 वाजता बंद करण्याची सक्ती करण्यात येते. मग क्लबमध्ये रात्रभर पार्टी कशा होतात, असा सवाल चर्चिल यांनी केला. काही क्लबच्या अतिक्रमणे तोडण्यात आली. राज्यात उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा क्लब सुरु आहेत. दक्षिण गोव्यातील दोन क्लबची नावे पोलिसांना दिलेली आहेत. राज्यातील परवाने नसलेल्या क्लबवर कारवाई होण्याची गरज आहे, अशी मागणी चर्चिल आलेमाव यांनी केली.