
पणजी: राज्यातील मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणीनंतर (एसआयआर) एकूण १ लाख ७८ मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली आहेत. ११ डिसेंबर अखेरपर्यंत १० लाख ८४ हजार ९५६ (९१.५५ टक्के) मतदारांचे एन्युमरेशन फॉर्म संकलित करून त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. सुमारे १ लाख ८२ हजार ८५५ मतदारांचे (८.४५ टक्के) अथवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नाही. अशा मॅपिंग न झालेल्या मतदारांबाबत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.
शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत गोयल यांनी सांगितले की, फॉर्म परत न आलेल्या १ लाख ७८ मतदारांचा 'एएसडीडी' (गैरहजर, स्थलांतरित किंवा मृत) या श्रेणीत समावेश केला आहे. यामध्ये मृत, अनुपस्थित, दुहेरी नाव असणे अथवा पत्ता कायमचा बदलला असलेल्या मतदारांचा समावेश आहे. १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मसुदा यादीत या मतदारांचे नाव असणार नाही. अशा मतदारांची नावे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने जाहीर केली जातील. यातील कुणाला आपले नाव चुकीच्या पद्धतीने काढले आहे असे वाटल्यास त्यांनी अर्ज भरून देणे आवश्यक आहे.
अशा व्यक्तींना घोषणापत्रही (Affidavit) द्यावे लागेल. सर्व कागदपत्रे योग्य असतील, तर या व्यक्तींची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील. राज्यात याआधी २००२ मध्ये एसआयआर झाले होते. २००२ आणि २०२५ च्या मतदार याद्यांची पडताळणी केली असता सुमारे १ लाख ८२ हजार ८५५ मतदारांचे मॅपिंग झालेले नाही. याचाच अर्थ, या मतदारांचे अथवा त्यांच्या आई किंवा वडिलांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नाही. या सर्व लोकांचे नाव मसुदा यादीत असेल. त्यांना १६ ते २० डिसेंबर दरम्यान नोटिसा पाठवण्यात येतील. यासाठी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल.
आकडेवारी पुढील प्रमाणे
* एकूण मतदार : ११ लाख ८५ हजार ३४
* संकलित झालेले एन्युमरेशन फॉर्म : १० लाख ८४ हजार ९५६
* मॅपिंग न झालेले : १ लाख ८२ हजार ८५५
* मृत मतदार : २५ हजार ५७४
* कायमस्वरूपी पत्ता बदलला : ४० हजार ४७३
* अनुपस्थित : २९ हजार ७५०
* दुहेरी मतदान : २००८
* फॉर्मवर सही नसणे व अन्य कारणे : २२७३
मतदान केंद्रांची संख्या वाढली
मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी माहिती दिली की, एसआयआर (विशेष सखोल फेरतपासणी) प्रक्रियेनंतर राज्यात मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. उत्तर गोव्यात १ आणि दक्षिण गोव्यात ७ मतदान केंद्रे वाढवण्यात आली आहेत, तर दक्षिणेतील २ मतदान केंद्रे बंद करण्यात आली आहेत. यामुळे आता राज्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या ६ ने वाढून १७३१ झाली आहे. या बदलाबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना कल्पना देण्यात आली आहे.