पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी ताळगावसह गोव्याचाही मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. पुढील कार्याकाळातही तेच मुख्यमंत्री असायला हवेत, असे ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात भाजप मेळाव्यात म्हणाल्या. ताळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा मेळावा झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
जुवारी नदीवरील पूल, मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटल असे अनेक प्रकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहेत. युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री कौशल्य योजना तसेच इतर उपक्रमही सुरू झाले आहेत. डबल इंजीन सरकारच्या कार्यकाळात गोव्यासह देशाचा झपाट्याने विकास होत आहे. ताळगाव मतदारसंघाचा विचार केला तर १३.२० कोटी रूपये खर्च करून रस्ते हॉटमिक्स करण्यात आले आहेत. फुटबॉल मैदानाच्या विकासासह इतर सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे जेनिफर मोन्सेरात यानी मेळाव्यात बोलताना सांगितले.