केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिले निर्देश
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवणे समाविष्ट होते. याअंतर्गत, भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता गृह मंत्रालयाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा तातडीने रद्द करण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवरून चर्चा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना पाकिस्तानात लवकर परत पाठवण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले.
हिंदू पाकिस्तानी नागरिकांसाठी एलटी व्हिसावर लागू नाही
गुरुवारी, भारताने २७ एप्रिलपासून पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्याची घोषणा केली होती आणि पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या देशात परतण्याचा सल्ला दिला होता. व्हिसा रद्द करण्याचा निर्णय हिंदू पाकिस्तानी नागरिकांना आधीच जारी केलेल्या दीर्घकालीन व्हिसावर लागू होणार नाही आणि त्यांचे व्हिसा वैध राहतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने असेही स्पष्ट केले.
भारतीय नागरिकांनी लवकरच पाकिस्तानातून परत यावे: परराष्ट्र मंत्रालय
भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी त्यांचा व्हिसाचा कालावधी संपण्यापूर्वी देश सोडावा. यासोबतच, भारतीय नागरिकांना पाकिस्तानला प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आणि पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय लोकांना लवकरच त्यांच्या देशात परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जारी केलेल्या निर्देशानंतर, सुरक्षेच्या मुद्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.