ईडीची कारवाई : पिळर्ण येथील घरालाही ठोकले टाळे
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोव्यात आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा टाकला आहे. ईडीने जमीन हडपप्रकरणी व्यावसायिक रोहन हरमलकर याच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी व इतर ठिकाणी छापा टाकून १ हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या हणजूण, हडफडे, आसगाव आणि इतर ठिकाणच्या जमिनींची बनावट कागदपत्रे, तसेच ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची अस्सल कागदपत्रे जप्त केली आहेत. पिळर्ण येथील हरमलकर याच्या घराला टाळे ठोकण्यात आले आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जमीन हडप केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) हणजूण येथील सर्वे क्रमांक ४४४/८ मधील २,४५० चौ. मी. जमीन संर्दभात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी कॅनडा येथे स्थायिक जॉयसे एझाबेल पिंटो यांच्यातर्फे मुखत्यारपत्रधारक अांतोनियो डिकॉस्टा यांनी एसआयटीकडे तक्रार केली होती. त्यानुसार, पिंटो यांची हणजूण येथे सर्व्हे क्रमांक ४४४/८ मधील २,४५० चौ.मी. वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन संशयित व्यावसायिक रोहन हरमलकर (गोलती - तिसवाडी), मॅथ्यू डिसोझा (मुंबई), देवानंद कवळेकर (पिर्ळण), पीटर वाझ (हणजूण), फेलिक्स नोरोन्हा (शापोरा), धुळेर - म्हापसा येथील अल्कांत्रो डिसोझा, जुन डिसोझा, आर्किबाल्ड डिसोझा, थेरेझा डिसोझा, मॅक्सी डिसोझा, टीना डिसोझा, वॅरोनिका डिसोझा यांनी षड्यंत्र रचून बनावट दस्तावेज तयार करून धुळेर म्हापसा येथील डिसोझा याच्या नावावर करून घेतली. त्या जमिनीबाबत रोहन हरमलकर याने डिसोझा कुटुंबियांसोबत करार केला. २८ जानेवारी २०१९ रोजी ती जमीन हरयाणा येथील आकाश चौधरी आणि सीमा चौधरी यांना विक्री केली.
या तक्रारीची दखल घेऊन एसआयटीने गुन्हा दाखल केला. एसआयटीने देवानंद कवळेकर याला अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. बार्देशचे निबंधक अर्जुन शेट्ये यांनी हणजूण येथील सर्वे क्रमांक ४२६/५ मधील जमीन हडप केल्याप्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आले. दोन्ही गुन्ह्यांची दखल घेऊन ईडीने चौकशी केली.
हरमलकरच्या घरांवर ईडीचा छापा
व्यावसायिक रोहन हरमलकर यांनी मोठ्या प्रमाणात जमीन व्यवहार केल्याची माहिती ईडीला मिळाली. ईडीचे अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी आणि उपसंचालक डाॅ. भागीरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ईडीने २४ आणि २५ एप्रिल रोजी रोहन हरमलकर याच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी व इतर ठिकाणच्या घरांवर तसेच कार्यालयावर छापा टाकला. ईडीने हरमलकर याच्याकडून १ हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेली हणजूण, हडफडे, आसगाव व इतर ठिकाणच्या जमिनीची, तसेच ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. याशिवाय ईडीने पिळर्ण येथील हरमलकर याच्या घराला टाळे ठोकले.