तपासात अडथळे : संशयिताची भाड्याची खोली शोधण्यातही अपयश

संशयिताला घटनास्थळी घेऊन जाताना पोलीस. (निवृत्ती शिरोडकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : उत्तर गोव्यातील हरमल आणि मोरजी या प्रसिद्ध किनारी भागांत दोन रशियन महिलांचा गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी अटक केलेला संशयित आलेक्सी लिओनोव (३७) हा रशियन नागरिक पोलिसांना चौकशीत असहकार्य करत आहे. स्वत:च्या रहात असलेल्या भाड्याच्या खोलीसह केलेल्या खुनांची पूर्ण आणि खरी माहिती देत नसल्याने पोलिसांचा तपास खुंटला आहे.
संशयित रशियन नागरिकाला शनिवार, १७ रोजी पेडणे न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आलेक्सीने सुरुवातीलाच वरील दोन रशियन महिलांसह भालखाजन-कोरगाव येथे राहणाऱ्या मृदुस्मिता सायकीया (४०, आसाम) आणि गोवा व हिमाचल प्रदेशमध्ये सुमारे १० ते १५ खून केल्याची माहिती दिली होती. मृदुस्मिता सायकीया हिचा ड्रग्जच्या अतिसेवनाने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सर्वच प्रकरणांची पोलीस कसून चौकशी करत आहेत; परंतु अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही सबळ पुरावा लागलेला नाही.
मांद्रे पोलिसांना तपास करूनही संशयित रहात असलेली भाड्याची खोली सापडलेली नाही. त्यामुळे संशयित खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत पोलिसांना दोन्ही रशियन महिलांचा खून करण्यासाठी संशयिताने वापरलेले हत्यार तेवढे मिळाले आहे. आपण दोन नव्हे, तर दहा ते पंधरा जणांना ‘मोक्ष’ दिल्याचा दावा संशयिताने केला होता. तो खरे बोलतो की पोलिसांची दिशाभूल करत आहे, याची सखोल पडताळणी पोलीस करत आहेत. तपासकामात पोलीस महासंचालक आलोक कुमारही मार्गदर्शन करत आहेत.
गुरुवारी एलिना कास्तानोव्हा (३७) या रशियन युवतीचा हरमल येथे गळा चिरून खून झाल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी एलिना वानिवा (३७) या रशियन युवतीचाही मृतदेह मोरजी येथे आढळला होता. तिचाही गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
अनेकांना प्रेमात ओढून पैसे उकळल्याचे निष्पन्न
संशयित आधी रशियन महिलांशी प्रेमसंबंध निर्माण करत असे. मात्र, एखादी महिला दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवत असल्याचा संशय आल्यास तो तिला त्रास देत होता. मागून तिचे हात बांधून तो तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता. नंतर तो तिची हत्या करत होता, अशी माहिती पुढे आली आहे. ज्यांच्या हत्या केल्या, त्यांच्याकडून त्याने मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचेही दिसून आले आहे. पैसे न दिल्यास तो त्यांचा मानसिक छळ करत होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हिमाचल प्रदेशच्या पोलिसांशीही चर्चा
पोलिसांना या प्रकरणाबाबत बाहेर काही वाच्यता करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. हे प्रकरण हायफ्रोफाईल होऊ शकते. संशयिताने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर पोलिसांची नाचक्की होऊ शकते; म्हणूनच गेले दोन दिवस पोलिसांनी या प्रकरणी अंतर्गत स्तरावर वेगाने तपास सुरू ठेवला आहे. हिमाचल प्रदेशमधील पोलिसांशीही गोवा पोलीस याबाबत चर्चा करत आहेत.